चीनच्या एकतर्फी कृतीमुळे संघर्ष  - संरक्षणमंत्री राजनाथसिंह

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 16 September 2020

कोणत्याही परिस्थितीत भारत नमते घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत देताना संसदेनेही एकमताने ठराव संमत करून संपूर्ण देश सैन्यदलांच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश द्यावा, असे आवाहनही संरक्षण मंत्र्यांनी केले. 

नवी दिल्ली - सीमेवरील चिनी आक्रमकता द्विपक्षीय करारांबद्दलचा अनादर दर्शविणारी असून ताबारेषेवरील यथास्थिती बदलण्याच्या एकतर्फी कारवाईमुळे संघर्षाची स्थिती उद्‍भवली आहे. मात्र भारतीय लष्कर सर्व परिस्थितीच्या मुकाबल्यासाठी सज्ज आहे, असा खणखणीत इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संसदेत सादर केलेल्या निवेदनातून चीनला दिला. 

चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावर विरोधकांच्या मागणीनंतर  लोकसभेत आज संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी निवेदनाद्वारे चीनच्या कुरापतींची माहिती देतानाच भारतीय लष्कराची तोंडभरून प्रशंसा केली. जवानांनी चिनी सैन्याला तोडीसतोड प्रत्युत्तर देताना संयमाच्या ठिकाणी संयम दाखवला आणि शौर्याच्या ठिकाणी शौर्य दाखवले, अशी स्तुतीसुमने संरक्षण मंत्र्यांनी उधळली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सीमेवर तैनात जवानांना पुरेसे गरम कपडे, शस्त्रसाठा, दारुगोळा, यासारखा रसद पुरवठा वाढविल्याचे सांगत या पेचप्रसंगासाठी दीर्घकाळ मुकाबल्याची भारताची तयारी असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत भारत नमते घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत देताना संसदेनेही एकमताने ठराव संमत करून संपूर्ण देश सैन्यदलांच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश द्यावा, असे आवाहनही संरक्षण मंत्र्यांनी केले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेसचा सभात्याग
संरक्षण मंत्र्यांच्या निवेदनानंतर विरोधकांनी विशेषतः काँग्रेसने सरकारकडून अधिक स्पष्टीकरणाची मागणी केली. लोकसभाध्यक्षांनी ती नाकारल्यामुळे काँग्रेस खासदार संतप्त झाले होते. विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे, असा आरोप करून काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. यावेळी काँग्रेस खासदारांनी चीनच्या घुसखोरीच्या प्रकरणात पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणारे फलकही झळकावले. तसेच सभात्यागानंतर संसद भवन परिसरातील गांधी पुतळ्यासमोर सरकारविरोधात निदर्शनेही केली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conflict due to China unilateral action say Defense Minister Rajnath Singh