नीट-जेईईच्या परीक्षेच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आक्रमक; केंद्र सरकारवर जोरदार टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 26 August 2020

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नीट-जेईई परीक्षेच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नीट-जेईई परीक्षेच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी बुधवारी व्हिडिओ परिषदेद्वारे आपल्या सहयोगी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या बैठकीत काँग्रेस शासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला होता. यावेळी सर्व नेत्यांनी कोरोना काळात केंद्र सरकारने राज्याराज्यात भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. शिवाय नीट-जेईई परीक्षा घेण्याच्या केंद्राच्या निर्णयावर जोरादार टीका केली आहे. 

बैठकीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुद्दचेरीचे मुख्यमंत्री वी नारायणसामी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सहभाग घेतला होता. 

माध्यमातील चुकीच्या बातम्यांमुळे गरिबी हटणार नाही; RBIच्या रिपोर्टवरुन राहुल...

व्हिडिओ परिषदेच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीट-जेईई प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका रिपोर्टनुसार, जेव्हा अमेरिकेत शाळा सुरु करण्यात आल्या तेव्हा जवळजवळ 10 हजार विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे येथे परीक्षा घेतल्यास अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होईल, असं ते म्हणाले आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व राज्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आपण सर्वांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन परीक्षांना स्थगिती देण्याची विनंती करायला हवी. जोपर्यंत परिस्थिती चांगली होत नाही, तोर्यंत परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात. परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत, आपण का विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत आहोत. मी या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांना पत्र लिहिलं आहे. मात्र, मला काहीही उत्तर मिळालं नाही, असं ममता म्हणाल्या आहेत.

चीनने घेतला अमेरिकेशी पंगा; घुसखोरी केल्याचा आरोप

नीट-जेईई परीक्षेवरुन तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन सौहार्दपूर्ण तोडगा काढावा, असे आवाहन केंद्र सरकारला ट्विटद्वारे केले. देशभरात कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय व अभियांत्रिकीसाठीची ही प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

राहुल गांधी म्हणाले, की नीट-जेईई परीक्षार्थी कोरोना संसर्गामुळे स्वत:चे आरोग्य व भविष्याबद्दल चिंतेत आहेत. आसाम आणि बिहारमधील पुरामुळेही विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन स्वीकारार्ह तोडगा काढावा. मोदी सरकारला विद्यार्थीविरोधी असल्याचा आरोप करत तसा हॅशटॅगही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये वापरला.

नीट-जेईई परीक्षार्थी स्वत:चे आरोग्य व भविष्याबद्दल चिंतेत आहेत. त्यांची ‘कोव्हिड १९’ च्या संसर्गाची भीतीही खरी आहे. त्यातच पूरग्रस्त आसाम व बिहारमधील वाहतुक व निवासाचीही त्यांना चिंता आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress aggressive on Neat-JEE exam issue Strong criticism of the central government