Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल; मतमोजणीवेळी दक्ष राहा...प्रदेशाध्यक्ष, उमेदवारांशी चर्चा

केंद्रात तिसऱ्यांदा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत येण्याचा अंदाज बहुतांश संस्थांनी मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तवला आहे.
Lok Sabha Election 2024 result
Lok Sabha Election 2024 resultSakal

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ गटनेते आणि निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांसोबत आभासी माध्यमातून चर्चा केली. मतमोजणीवेळी कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्रात तिसऱ्यांदा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत येण्याचा अंदाज बहुतांश संस्थांनी मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तवला आहे. मात्र या चाचण्या बोगस असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ‘‘लोकसभा निवडणुकीत करण्यात आलेल्या गैरव्यवहाराचे समर्थन करण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणून आम्ही या चाचण्यांकडे पाहतो,’’ असे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले.

तर, ‘‘या चाचण्या म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या मीडियाने घेतलेल्या चाचण्या आहेत,’’ असे राहुल गांधी यांनी प्रतिक्रियेदाखल सांगितले. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी किती जागा जिंकेल, असे विचारले असता सिद्धू मुसेवाला याचे २९५ नावाचे गाणे ऐकले आहे. तेवढ्या जागा येतील’, असे गांधी म्हणाले.

‘‘इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी पंतप्रधान मोदी मानसिक खेळ खेळत आहेत,’’ असा आरोप जयराम रमेश यांनी केला. ‘‘केंद्रात अद्याप कोणाचेही सरकार बनलेले नाही. अशावेळी पंतप्रधान मोदी शंभर दिवसांचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवत आढावा बैठका घेत आहेत.

एकप्रकारे नोकरशहांवर दबाव टाकण्यासाठी व आपण परत येणार आहोत, असा संदेश देण्यासाठी ते बैठका घेत आहेत. मतमोजणीच्या वेळी नोकरशहा आणि प्रशासकीय यंत्रणा कोणाच्याही दबावाखाली येणार नाही, अशी आपणास आशा आहे,’’ असेही रमेशयांनी सांगितले.

‘एजंटना मनाई नाही’

‘‘मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवारांच्या एजंटना बसण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. मी आतापर्यंत नऊ वेळा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत, मात्र पहिल्यांदाच असे होत आहे.

एकप्रकारे ‘ईव्हीएम’पेक्षा मोठा गैरव्यवहार या वेळी होणार आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. मात्र, ‘‘उमेदवाराच्या एजंटना मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही,’’ असे दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

‘दिल्लीतील जागा इंडिया आघाडी जिंकेल’

‘‘नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले तर मी डोक्यावरचे केस कापेन,’’ असे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

दिल्लीतील सर्वच्या सर्व सात जागा ‘इंडिया आघाडी’ जिंकेल, असा विश्वास भारती यांनी व्यक्त केला, तर मतदानोत्तर चाचण्या भाजपच्या कार्यालयात तयार करण्यात आल्याचा आरोप आपचे नेते, खासदार संजय सिंह यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com