Congress: काँग्रेसचं ठरलं! 'भारत जोडो'नंतर 'हात से हात जोडो' मोहीमेचा श्री गणेशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra

Congress: काँग्रेसचं ठरलं! 'भारत जोडो'नंतर 'हात से हात जोडो' मोहीमेचा श्री गणेशा

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने पुढील पक्ष वाढीची घोषणा केली आहे. काँग्रेस कडून सांगण्यात आलं आहे की, 'भारत जोडो यात्रे'नंतर 26 जानेवारीपासून देशभरात 'हाथ से हाथ जोडो अभियान' सुरू करणार आहे. या प्रचारासाठी पक्ष ब्लॉक, पंचायत आणि बूथ स्तरावर जनसंपर्क करणार आहे.

हेही वाचा: Yogesh Kadam Accident: आमदार योगेश कदम यांचा अपघात की घातपात?

ज्येष्ठ नेते पल्लम राजू हे या मोहिमेचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. १० जानेवारी रोजी विदर्भात प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची विस्तारित बैठक होणार आहे. या बैठकीत हात से हात जोडोचा राज्यव्यापी कार्यक्रम निश्चित होईल. ‘भारत जोडो’ नंतरचा हा दुसरा टप्पा राजकीय प्रचारासाठी असेल. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत.

त्या माध्यमातून विधानसभेची तयारीही केली जाईल. काँग्रेसला महाराष्ट्रात कायम उत्तम प्रतिसाद मिळत असे. त्यामुळे पक्षाने या वर्षी महाराष्ट्रावर भर द्यायचा, असे ठरवले आहे. जेथे आमदार निवडून येऊ शकतील त्या भागावर भर दिला जाईल.

हेही वाचा: Yogesh Kadam: शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला भीषण अपघात

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भासह अन्य सर्व भागांतील नेत्यांशी संपर्क ठेवला आहे. विदर्भावर भर देणे राजकीय फायद्याचे ठरेल, अशी आशा असल्याने कार्यकारिणी बैठक तेथे आयोजित करण्यात आली आहे. या भागासाठीचा कार्यक्रम निश्चित होईल.

महाराष्ट्राचा आराखडा तयार करा

महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य असल्याने राज्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश काँग्रेस श्रेष्ठींनी दिले आहेत. तीन माजी मुख्यमंत्री असलेल्या या राज्यात विधानसभेच्या जागा दुपटीने वाढतील का, याचा अंदाज घेतला जात आहे.

पल्लम राजू यांनी यासंदर्भात राज्याच्या महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करणे सुरु केले आहे. प्रत्येक जिल्ह्याचा एक प्रमुख आणि त्यांना साहाय्य करण्यासाठी दोन प्रभारी नेमले जातील.विद्यमान आमदार तसेच त्या त्या मतदारसंघातील पराभूत नेत्यांनाही या विचारप्रक्रियेत सहभागी केले जाते आहे.

कोपरा सभा, तालुकास्तरावर चौक सभा, जिल्हास्तरावर मेळावे असे आयोजन केले जाते आहे. भाजपच्या राजवटीत महागाई वाढली, धर्माच्या राजकारणाचा उपयोग करत धुव्रीकरण करण्याचे प्रयत्न, बेरोजगारीत झालेली वाढ या मुद्द्यांवर ‘हात से हात जोडो’ मोहिमेत विशेष लक्ष दिले जाईल.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने लवकरच निवडणुका होत आहेत. त्यामुळेच येथे ‘हात से हात जोडो’ मोहिमेत राजकारण हा केंद्रबिंदू ठरेल असे काँग्रेस नेत्याने स्पष्ट केले.

टॅग्स :Rahul GandhiCongress