Mallikarjun Kharge : गांधी, पटेलांवर काँग्रेसचाच हक्क; भाजपकडून चुकीचा प्रचार

पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात मतभेद असल्याचे गैरसमज संघ-भाजपकडून पसरविले जात आहेत.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Khargesakal
Updated on

अहमदाबाद - ‘राष्ट्रीय महापुरुषांबाबत एक सोईस्कर षड्‌यंत्र रचले जात आहे. पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात मतभेद असल्याचे गैरसमज संघ-भाजपकडून पसरविले जात आहेत. गांधीजींशी संबंधित संस्थाही बळकावल्या जात आहेत,’ असा घणाघाती प्रहार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अहमदाबाद येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत केला. तसेच, महात्मा गांधी व पटेल यांच्यावर वैचारिक हक्क काँग्रेसचाच असल्याचेही खर्गे यांनी ठणकावले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकस्थळी संसदीय पक्षनेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, सरचिटणीस, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, कायम निमंत्रित सदस्य अशा १५८ सदस्यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी बैठक झाली. या बैठकीचे उद्‌घाटन करताना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि काँग्रेसचे नाते अधोरेखित केले.

सरदार पटेलांच्या पुतळ्याला काँग्रेसच्या नेत्यांनी अभिवादन केल्यानंतर कार्यकारिणी बैठकीला सुरुवात झाली. यावेळी खर्गे यांनी, महात्मा गांधीजींच्या संस्था रा. स्व. संघ आणि भाजपकडून बळकावल्या जात असल्याची चिंता व्यक्त केली. ‘लोकांना गांधीजींचा चष्मा आणि लाठी चोरता येऊ शकते पण ते त्यांच्या आदर्शांवर चालू शकत नाही. गांधीजींचे विचार ही खरी संपत्ती असून ती काँग्रेसची आहे,’ असेही खर्गे म्हणाले.

तसेच, गांधी-पटेल यांच्याशी काँग्रेसची वैचारिक जवळीक असल्याची उदाहरणेही दिली. सोबतच, नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात मतभेद असल्याचे गैरसमज संघ-भाजपकडून पसरविले जात असून मागील गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय महापुरुषांबाबत एक सोईस्कर षड्‌यंत्र रचले जात असल्याचे टीकास्त्र खर्गे यांनी सोडले.

खर्गे म्हणाले, ‘‘देशाच्या मूलभूत समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी जातीय विभाजन केले जात आहे. दुसरीकडे, मूठभर लोकांच्या हातात सर्व साधनसंपत्ती सोपवून यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरदार पटेलांना पंडित जवाहरलाल नेहरू ‘भारताच्या एकतेचे संस्थापक’ म्हणत.

सरदार पटेलांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कराची अधिवेशनात मूलभूत अधिकारांवर प्रस्ताव संमत करण्यात आला होता. तो भारतीय संविधानाच्या आत्म्याचे प्रतीक आहे. परंतु, अनेक वर्षांपासून काही लोक राष्ट्रीय नायकांबद्दल पद्धतशीर षड्‌यंत्र रचत आहेत. देशसेवेचा १४० वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेसविरुद्ध वातावरण निर्माण केले जात आहे. ज्यांचे कोणतेही योगदान नाही, अशा लोकांकडून हे काम सुरू आहे.’

‘आता तेच लोक वारसा सांगतात’

‘सरदार पटेल आणि पंडित नेहरू एकमेकांच्या विरोधात असल्याचे दर्शविले जात आहे. परंतु दोन्ही नेते एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखे होते. नेहरू हे प्रत्येक विषयावर सरदार पटेल यांचा सल्ला घेत असत. सरदार पटेल यांची विचारसरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात होती. त्यांनीच बंदी घालून संघाला जनतेपासून दूर ठेवले होते.

मात्र आज संघाचे लोक सरदार पटेल यांच्या वारशावर हक्क सांगत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेचा सदस्य बनवण्यात गांधीजी आणि सरदार पटेल यांची महत्त्वाची भूमिका होती. सरदार पटेल काँग्रेसच्या मनात आणि विचारांमध्ये आहेत. म्हणूनच कार्यकारिणी बैठक अहमदाबादमधील सरदार पटेल स्मृतीस्थळी आयोजित केली आहे,’ असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

अन् ओबीसी दूर गेले - राहुल गांधी

‘आपण दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण यांच्यातच अडकून पडलो त्याच काळात इतर मागासवर्गीय (ओबीसी) आपल्यापासून दूर झाले. काँग्रेस पक्ष जेव्हा अल्पसंख्याकाच्या हिताच्या गोष्टी करतो, मुस्लिम समुदायाबाबत बोलतो तेव्हा त्याच्यावर टीका करण्यात येते पण या टीकेला आपण घाबरता कामा नये.

पक्षाने सातत्याने अशा प्रकारे मुद्दे उपस्थित करायला हवेत,’ असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी सध्या देशामध्ये आकारास येत असलेल्या सामाजिक समीकरणांवर देखील त्यांनी विस्ताराने भाष्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com