esakal | Bihar Election : काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर ;बंडानंतर पहिल्यांदाच पायलटांवर मोठी जबाबदारी
sakal

बोलून बातमी शोधा

Congress In Bihar

सत्ताधारी नितीश कुमार यांच्या 15 वर्षांच्या राजवटीनंतर आता एँटी-इन्कम्बसीचे वातावरण असल्याचे बोललं जात आहे.

Bihar Election : काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर ;बंडानंतर पहिल्यांदाच पायलटांवर मोठी जबाबदारी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षांचे महागठबंधन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीला उत आला आहे. सत्ताधारी नितीश कुमार यांच्या 15 वर्षांच्या राजवटीनंतर आता एँटी-इन्कम्बसीचे वातावरण असल्याचे बोललं जात आहे. एनडीएतील प्रमुख घटकपक्ष लोकजनशक्ती पार्टीनेही आता जेडीयूविरोधातच दंड थोपटला आहे. या साऱ्या परिस्थितीचा फायदा राजद-काँग्रेस आघाडीला होईल का, हे पाहणं निर्णायक ठरेल. बिहारच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख आता जवळ आली आहे. अशातच काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. 

यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी हे असणार आहेत. याशिवाय काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा, गुलाम नबी आझाद आणि सचिन  पायलट हेही असणार आहेत. पायलट यांनी केलेल्या बंडानंतर पक्षाने त्यांना दिलेली ही  पहिलीच मोठी जबाबदारी असणार आहे. यांच्याव्यतिरिक्त माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, रणदीप सुरजेवाला, अशोक गेहलोत आणि तारिक अन्वर यांचीही नावे या यादीत समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील संजय निरुपम यांचाही यात समावेश आहे. 

हेही वाचा - Bihar Election : असाही एक चहावाला; हटके पद्धतीने मतदानाविषयी करतोय जागृती

कोरोना काळात पार पडणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन एकूण प्रक्रिया पार पाडण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. बिहारच्या या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार आहेत. यातील मतदानाचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर उर्वरित दोन टप्पे 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर प्रचारातील आमनासामनी पाहणे रंजक ठरणार आहे. 

loading image
go to top