'खेती बचाओ' यात्रा सुरु; राहुल गांधी म्हणाले, 'सत्तेवर येताच कृषी विधेयक मागे घेणार'

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 4 October 2020

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली पंजाबमधील मोगा येथे 'खेती बचाओ' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली पंजाबमधील मोगा येथे 'खेती बचाओ' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि हाथरस प्रकरणावरुन उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर टीकास्त्र सोडले. कोरोना काळात हे 3 विधेयक लागू करण्याची काय गरज होती, असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधान म्हणतात की, शेतकऱ्यांसाठी कायदे केले जात आहेत. जर शेतकऱ्यांसाठी कायदे केले जात असतील तर लोकसभा, राज्यसभेत खुली चर्चा का झाली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर हे तीन काळे कायदे संपुष्टात आणले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 

बागेत सापडलेल्या एका वस्तूने केरळला जोडलं थेट रोमन साम्राज्याशी

योगी सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये परिस्थिती इतकी वाईट आहे की, ज्या कुटुंबातील मुलीचा मृत्यू झाला आहे, त्यांनाच मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी धमकी देत आहेत. संपूर्ण भारतात ही स्थिती आहे. गुन्हेगारांना काहीच झालं नाही पण पीडित कुटुंबाविरोधातच कारवाई केली गेली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

कृषी विधेयकाबाबत बोलताना ते म्हणाले की, जर शेतकरी या कायद्यामुळे आनंदी असतील तर देशभरात आंदोलनं का केली जात आहेत. पंजाबचा प्रत्येक शेतकरी आंदोलन का करत आहे? मी तुम्हाला खात्री देतो की, ज्या दिवशी काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल. त्यावेळी हे तीनही काळे कायदे हटवून कचऱ्यात फेकू, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

Hathras case: पीडिता आणि आरोपींच्या कुटुंबात 23 वर्षांपासून वैर

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू खूप दिवसानंतर पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. ते म्हणाले की, अमेरिकेची फसलेली पॉलिसी आपल्यावर थोपवण्याचा प्रकार केला जात आहे. उद्योगपती देश चालवत आहेत. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या फायद्याला 'अनुदाना'चे लेबल लावले जात आहे. तर श्रीमंतांना देण्यात येणाऱ्या लाखो रुपयांच्या सवलतींना 'इन्सेंटिव्ह' म्हटले जाते, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Kheti Bachao yatra Rahul Gandhi Attack on modi government for agricultural ordinances