नरेंद्र माेदींना कोरोना, चीनप्रश्‍न हाताळता आला नाही : पृथ्वीराज चव्हाण

सचिन शिंदे
Sunday, 20 September 2020

एकीकडे सीबीआयची स्वायत्तता कायम राहिलेली नाही, हे स्पष्ट होते. दुसरीकडे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला जातो आहे. त्या सगळ्या हालचाली राजकीय हेतूनेच होत आहेत, अशी शंका घेण्यास वाव आहे.

कऱ्हाड : कोरोनाच्या काळातही जगातील 105 देशांतील संसदेचे कामकाज सुरू होते. केवळ देशातील संसदेचे कामकाज सहा महिन्यांपासून बंद आहे. कोरोना, चीनसह अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकार साफ अपयशी ठरले आहे. त्या सगळ्या अपयशाला झाकण्यासाठीच केंद्र सरकारने सहा महिने संसदेचे कामकाज बंद ठेवले. त्या सगळ्या अपयशांवर संसदेत चर्चा होऊ नये, हीच त्यामागची भूमिका होती, असा आरोप माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण केली. दै."सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले.
 
केंद्र सरकारची स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे, असे स्पष्ट करून श्री. चव्हाण म्हणाले,"" तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा. मात्र, तुम्हाला सध्याची स्थिती सावरता आलेली नाही. सरकार म्हणून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण करू शकलेले नाही. जगातील कोणत्याच देशाने कोरोनाला देवाची करणी म्हटलेले नाही. केवळ आपल्याच सरकारने ते स्पष्ट केले आहे. त्यावरून त्यांची स्थिती गोंधळल्यासारखी आहे. चीन, कोरोनाची स्थिती व देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारला साफ अपयश आले आहे. ते अपयश लपविण्यासाठीच त्यांनी सहा महिने संसद बंद ठेवले आहे. कोणत्याच देशाने त्यांचे कामकाज बंद ठेवले नव्हते. रशियात बंद होते. तेथे हुकमाशाहीच आहे. मात्र, भारतात ते बंद ठेवले. कारण संसदेमध्ये त्या अपयशाची चर्चा त्यांना होऊ द्यायची नव्हती. संविधानात सहा महिन्यांपेक्षाही जास्त काळासाठी संसदेचे कामकाज बंद ठेवता येत नाही, तशी तरतूद केली आहे. त्यामुळे त्यांनी सहा महिने संपण्यापूर्वीच एकदा संसदेचे कामकाज सुरू केले. आता पुन्हा ते कधी सुरू करतील, याची गॅरंटी नाही.''

चिनी ड्रॅगनला चारीमुंड्या चित करु : माजी सैनिकांचं सळसळलं रक्त
 
सीबीआयची स्वायत्तता कायम नाही, तर मुंबई पोलिसांवर केंद्राचा अविश्वास आहे, अशी स्थिती निर्माण करून त्याचे राजकारण भाजप करत आहे, अशी टीका करून आमदार चव्हाण म्हणाले,"" सुशांतसिंह राजपूत याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने तपास केला असता. मात्र, त्यांना तो करू न देण्याची भूमिका केंद्राने केली. त्यामागे बिहारचे राजकारण आहे. मुंबई व बिहार या दोन राज्यांचा राजपूत यांच्या प्रकरणाच्या तपासावरून वाद होता. त्याचाच फायदा घेऊन केंद्राने त्याची सूत्रे सीबीआयकडे देण्यात यश मिळवले. यात राजकारण नक्कीच आहे. एकीकडे सीबीआयची स्वायत्तता कायम राहिलेली नाही, हे स्पष्ट होते. दुसरीकडे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला जातो आहे. त्या सगळ्या हालचाली राजकीय हेतूनेच होत आहेत, अशी शंका घेण्यास वाव आहे. राजपूतच्या आत्महत्येपासून अभिनेत्री कंगना राणावत अन्‌ सध्याच्या अंमली पदार्थांचे रॅकेटपर्यंत फिरणारा तपास राजकीय हस्तक्षेपाचाच भाग आहे. कंगना राणावत महाराष्ट्राबद्दल बोलली ते अत्यंत चुकीचेच आहे. त्याचा पूर्वीच आम्ही निषेध केला आहे.''

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी पाळा आहार-विहाराचे हे नियम
 

कांदा निर्यातीचा निर्णय 100 टक्के चुकीचा आहे. शेतकऱ्यांना काही फायदा होतोय, असे चित्र दिसू लागले की, केंद्र सरकार त्याला खो घालताना दिसत आहे. ते अत्यंत चुकीचे आहे. म्हणून हरियाणा, दिल्ली येथे शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे. केंद्राने कांदा निर्यातीवरील बंदी 100 टक्के मागे घ्यावी. 

-आमदार पृथ्वीराज चव्हाण

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Prithviraj Chavan Criticizes PM Narendra Modi On Covid Pandemic And China Satara News