बिहारला महागठबंधन विजयी होईल; काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा

हेमंत पवार
Sunday, 25 October 2020

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर रोष दाखवला आहे. त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही. त्यांच्याबद्दल छळवाद झाला, असा आरोप केला आहे. त्यांनी पक्षांतर केले आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे सांगून आमदार चव्हाण यांनी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू, असा विश्वास व्यक्त केला.

कऱ्हाड ः बिहारमध्ये भाजपबद्दल प्रचंड नाराजी आहे. नितीशकुमार यांच्याबद्दल वैयक्तिक अंतर्गत नाराजी आहे. लालूप्रसाद यादव यांना बरेच दिवस तुरुंगात ठेवल्याने त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. नव्या पिढीचे युवक बाहेर निघाले आहेत. त्यामुळे बिहारमध्ये महागठबंधन विजयी होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
 
ते म्हणाले, ""भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात बिहारमध्ये फुकट कोरोनाची लस देऊ असे जाहीर केले. मी त्या वक्तव्याचा निषेध केला. केंद्र सरकारला असे बिहारपुरते करता येणार नाही. केवळ राजकारणासाठी, मते मिळवण्यासाठी लस देणे निषेधार्ह आहे. त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांना सर्व राज्यांनाच लस द्यावी लागेल. महामारीबद्दल राजकारण करू नये, असे आमचे म्हणणे आहे. मोदी सरकारला केवळ निवडणुका जिंकण्याशिवाय लोकांचे, शेतकऱ्यांचे काहीही देणघेण नाही. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली याकडे लक्ष नाही. फक्त निवडणूक जिंकणे एवढाच त्यांच्यासमोर विषय आहे.''

पुणे- सातारा रस्ता जेसीबीने उखडणार; उदयनराजेंचा इशारा
 
ते म्हणाले, ""कोविड सुरू होण्यापूर्वीच भारताच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली. नोटाबंदी, जीएसटी आणि कोरोनामुळे केलेले लॉकडाउनचा परिणाम झाला आहे. कोविडची मोठी किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला मोजावी लागली आहे. पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेचे उत्पन्न 24 टक्‍क्‍यांनी घटले. देशाच्या 200 वर्षांच्या इतिहासात असे कधीच झाले नाही. जगात देशाची अर्थव्यवस्था अधिक केवीलवानी झाली आहे. त्याचा परिणाम रोजगारावर, दैनंदिन जीवनावर होणार आहे.''
 
ते म्हणाले, ""चीनबरोबरचा भारताचा संघर्ष सुरू आहे. त्यात सकारात्मक चिन्हे दिसत नाहीत. चीन ऐकायला तयार नाही. सरकार अधिकृतपणे काहीच माहिती सांगत नाही. मात्र, काही निवृत्त सैन्य अधिकारी, काही चॅनेलकडून चीनने दोन चार महिन्यांत 1200 स्केअर किलोमीटरचा प्रदेश व्यापला आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवला पाहिजे. मात्र, आपण वेगळ्या मार्गाने गेलो. त्यामुळे चर्चेतून मार्ग सुटेल असे दिसत नाही. चीन मागे हटायला तयार नाही. चीनची भारतापेक्षा अर्थव्यवस्था मोठी आहे.'' 

लॉकडाउनमध्ये बचत गटांच्या महिला लक्षाधीश!

खडसेंना माझ्या शुभेच्छा 

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर रोष दाखवला आहे. त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही. त्यांच्याबद्दल छळवाद झाला, असा आरोप केला आहे. त्यांनी पक्षांतर केले आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे सांगून आमदार चव्हाण यांनी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू, असा विश्वास व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Prithviraj Chavan Says Lalu Prasad Yadav Will Win In Bihar Election Satara News