esakal | 'शेतकऱ्यांनाच नको असतील तर हे कायदे सरकार मागे का घेत नाही?'
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka gandhi

काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांनी आज सोमवारी बिजनोरमधील या किसान महासभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

'शेतकऱ्यांनाच नको असतील तर हे कायदे सरकार मागे का घेत नाही?'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या साधारण 80 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राने पारित केलेले कृषी कायदे काळे असून ते रद्द केले जावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ देशात ठिकठिकाणी किसान महापंचयातीचं आयोजन केलं जात आहे. त्यातीलच एक महापंचायत आज उत्तर प्रदेशमधील बिजनोरमध्ये होती. काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांनी आज सोमवारी बिजानेरमधील या किसान महासभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी विचारलं की, मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाले काय? पुढे त्यांनी म्हटलं की, मी इथे भाषण द्यायला आलेली नाहीये. मी तुमच्याशी बातचित करायला आली आहे. 

यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 80 दिवसांपासून ऐन कडाक्याच्या थंडीत बसले आहेत. आणि आता ते उन्हाळ्यासाठी स्वत:ला तयार करत आहेत. ते कशासाठी बसले आहेत? पंतप्रधान मोदी म्हणतात की हे कायदे त्यांच्याच हिताचे आहेत. मात्र, जर शेतकऱ्यांना हे कायदे नको असतील तर तुम्ही हे कायदे मागे का घेत नाही आहात?

पुढे त्या म्हणाल्या की, कधीकधी मी विचार करते की लोकांनी मोदींना दुसऱ्यांदा का निवडलं असेल? त्यांना बहुदा आशा असावी की ते त्यांच्यासाठी काम करतील म्हणून त्यांनी निवडून दिलं असेल. पहिल्या निवडणुकीदरम्यान बरंच काही बोललं गेलं होतं. तसेच दुसऱ्या निवडणुकीतही बोललं गेलं. पण सरतेशेवटी झालं काय? काहीच नाही!

हेही वाचा - 'ते' घाबरलेत, देश नाही; दिशा रवीच्या अटकेवरुन राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

प्रियंका गांधी यांनी विचारलं की 2017 पासून इथे उसाचा भाव वाढला नाहीये. पतंप्रधान मोदींनी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं नाही. मात्र, स्वत:साठी 16 हजार कोटींचं विमान खरेदी केलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं की, मोदी सरकारने जो नवा कायदा आणला आहे त्यामुळे मोठे उद्योगपतीच संपत्ती जमा करु शकतात. पंतप्रधान मोदी अमेरिका, चीन आणि पाकिस्तानला जाऊ शकतात. मात्र दिल्लीमध्ये बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊ शकत नाहीत. मोदींनी शेतकऱ्यांची थट्टा उडवली आहे. ते त्यांना आंदोलनजीवी आणि परजीवी म्हणतात.