esakal | आज काँग्रेस स्थापना दिवस अन् राहुल गांधी पुन्हा परदेश दौऱ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

4rahul_gandhi_ncp.jpg

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या मते, राहुल गांधी हे काही दिवसांसाठी बाहेर असणार आहेत. राहुल गांधी हे इटलीला रवाना झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

आज काँग्रेस स्थापना दिवस अन् राहुल गांधी पुन्हा परदेश दौऱ्यावर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे वैयक्तिक कारणासाठी विदेशात रवाना झाले आहेत. राहुल गांधी हे कुठे गेले आहेत, हे पक्षाकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे आज (28 डिसेंबर) काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच (दि.27) राहुल गांधी हे विदेशात रवाना झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या मते, राहुल गांधी हे काही दिवसांसाठी बाहेर असणार आहेत. राहुल गांधी हे इटलीला रवाना झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

सुरजेवाला यांना राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, राहुल गांधी हे 'शॉर्ट पर्सनल व्हिजिट'साठी विदेशात रवाना झाले आहेत. ते काही दिवसांसाठी बाहेर राहतील. परंतु, त्यांनी राहुल गांधी हे कुठे गेले आहेत, याची माहिती दिली नाही. 

हेही वाचा- हरिद्वारमध्ये पुढील वर्षी रंगणार कुंभमेळा;साडेतीन महिन्यांऐवजी ४८ दिवस होणार

'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी कतार एअरवेजच्या फ्लाइटने इटलीतील मिलानसाठी रवाना झाले आहेत. त्यांची आजी इटलीत राहते आणि त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी यापूर्वीही तिथे गेले आहेत. विशेष म्हणजे सोमवारी काँग्रेसचा 136 वा स्थापना दिवस आहे. त्याच्या एक दिवस आधीच राहुल गांधी हे भारताबाहेर गेले आहेत. स्थापना दिवसानिमित्त अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात ध्वजारोहण केले जाते. यावेळी गांधी कुटुंबीयांसमवेत काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित असतात. 

दरम्यान, कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना गेल्या एक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर या संघटना ठाम आहेत. या आंदोलनाला काँग्रेसचे समर्थन आहे. राहुल गांधी याप्रकरणी दररोज मोदी सरकारवर टीका करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी नुकताच राष्ट्रपतींना निवेदनही दिले आहे. याचदरम्यान राहुल गांधी विदेशात गेल्याने भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. 

हेही वाचा- मन की बात कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांनी केला थाळ्या वाजवून निषेध

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत, असे टि्वट करुन राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.