राहुल गांधींनी स्वत: ट्रॅक्टर चालवत केला हरियाणात प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 6 October 2020

कृषी कायद्यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे

नवी दिल्ली- कृषी कायद्यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. या सुधारित कायद्यांना विरोध करण्यासाठी काँग्रेसने पंजाब-हरियाणा राज्यातून तीन दिवसाच्या ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. 'खेत बचाव यात्रे'अंतर्गत राहुल गांधी स्वत: ट्रॅक्टर चालवत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि राज्य प्रमुख सुनिल जाखर हेही उपस्थित होते. 

राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांना हरयाणा सीमेवर रोखण्यात आले होते. त्यांना राज्यात येण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. राहुल गांधी यांनी याला विरोध करत जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत तेथेच थांबणार असल्याचं सांगितलं होतं. माझी इथे वाट पाहात राहण्याची तयारी आहे. 1 तास, 2 तास, 24 तास, 100 तास, 1000 तास किंवा 5000 तास मी याठिकाणी वाट पाहू शकतो, असं ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांना हरियाणात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

कुलभूषण जाधव यांची केस लढण्यास पाकिस्तानी वकीलांचा नकार

सुधारित तीन कृषी कायद्याविरोधात विरोधक एकवटले आहेत, तसेच देशातील अनेक शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा व्यक्त करत राहुल गांधी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी किसान की बात या कार्यक्रमाअंतर्गत देशातील शेतकऱ्यांशी संवादही साधला होता. केंद्र सरकारच्या  भूमिकेमुळे पंजाब राज्याला सर्वात मोठे नुकसान होईल आणि हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांवरील हल्ला आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.  पंजाबमधील पटियाला येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती आरोप लावले.  

जे कायदे मोदी सरकारने बनवले आहेत, ते शेतीचा आणि खाद्य सुरक्षेबाबत सध्याची संरचना नष्ट करण्यासाठीचा मार्ग आहे. हे शेतकऱ्यांवरचं आक्रमण आहे आणि या आक्रमणाला आम्ही थांबवू, या कायद्याविरोधात आम्ही लढू. मला असे वाटते की कृषी कायदे काय आहेत ते स्वत: पंतप्रधान  मोदी यांनाही समजलेले नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी निशाणा साधला होता.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Rahul Gandhi drives a tractor