काँग्रेस नेत्याच्या अंत्ययात्रेत राहुल गांधींनी पार्थिवाला दिला खांदा

टीम ई सकाळ
Friday, 19 February 2021

गोव्यात बुधवारी निधन झाल्यानंतर सतिश शर्मा यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी दिल्लीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सतिश शर्मा हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे जवळचे सहकारी होते. 

दिल्ली - काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतिश शर्मा यांचे बुधवारी गोव्यात निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतिश शर्मा हे कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला होता. आता सतिश शर्मा यांच्या अंत्ययात्रेवेळी त्यांच्या पार्थिवाला खांदाही दिला. 

सतिश शर्मा यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना राहुल गांधींनी म्हटलं होतं की, कॅप्टन सतिश शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झालं. त्यांच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे. आम्हाला त्यांची आठवण नेहमीच येत राहील.

गोव्यात बुधवारी निधन झाल्यानंतर सतिश शर्मा यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी दिल्लीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सतिश शर्मा हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे जवळचे सहकारी होते. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये 1993 ते 1996 या कालावधीत त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा पदभार सांभाळला होता. आंध्रप्रदेशातील सिकंदराबादमध्ये 11 ऑक्टोबर 1947 रोजी जन्मलेले सतिश शर्मा हे पायलट होते. यातूनच त्यांची मैत्री राजीव गांधींशी झाली होती. 

हे वाचा - काश्मीरमध्ये चकमक; सुरक्षादलाने 3 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

राजीव गांधी यांनीच त्यांच्या या पायलट मित्राला राजकारणा आणलं होतं. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. तेव्हा राजीव गांधी यांनी सतिश शर्मा यांना अमेठी मतदारसंघाचे काम पाहण्याची जबाबदारी दिली होती. तेव्हा पायलटच्या नोकरीचा राजीनामा देऊन सतिश शर्मा हे राजीव गांधींच्या कोअर टीमचे सदस्य बनले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Rahul Gandhi in mortal of Captain Satish Sharma