काश्मीरमध्ये चकमक; सुरक्षादलाने 3 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

टीम ई सकाळ
Friday, 19 February 2021

 जम्मू काश्मीरच्या शोपिया सेक्टरमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या शोपिया सेक्टरमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारुगोळा होता तो जप्त करण्यात आला. सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतरही सुरक्षादलांनी संपूर्ण परिसरात फौजफाटा तैनात केला असून शोधमोहिम राबवली आहे. 

भारतीय सुरक्षादलांना गुप्त माहिती मिळाली होती की, काही दहशतवादी एका घरात लपून बसले आहेत. ते दहशतवादी कट रचत असल्याचंही समजलं होतं. माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने एक पथक तयार केलं. त्यानंतर परिसरात शोधमोहिम सुरु केली. शोध मोहिमेवेळी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी सांगितलं गेलं मात्र त्यांनी गोळीबार केला. 

दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाल्यानंतर किती दहशतवादी असू शकतील याचा अंदाज सुरक्षा दलाला आला. अनेक तास दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार कऱण्यात सुऱक्षादलांना यश आले. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. 

हे वाचा - उन्नावमध्ये दोन मुलींचा संशयित मृत्यू; शवविच्छेदन अहवाल आला समोर

जम्मू काश्मीरमधील बडगामच्या बीरवामध्येही चकमक झाली. यावेळी राज्यातील पोलिस कर्मचारी एसपीओ मोहम्मद अल्ताफ हुतात्मा झाले. तर एक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. शुक्रवारी पहाटे बडगामच्या बीरवा परिसरात चकमक सुरु झाली होती. काश्मीरच्या विभागीय पोलिसांनी सांगितले की, पोलिस आणि सुरक्षा दल सध्या घटनास्थळी असून परिसरात शोध घेतला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jammu and kashmir Three LeT terrorists neutralised in Shopian