राष्ट्रहिताच्या नजरेतून : नेत्यांनी अभ्यासूनी प्रकटावे

काँग्रेस नेते सलमान खुर्शिद हे वादग्रस्त विधाने करणारे पहिले नेते नाहीत. ही त्यांची वैचारिक दिवाळखोरीच आहे. मात्र शैथिल्य आलेल्या काँग्रेस नेत्यांनी इसिसबद्दल नक्कीच वाचायला हवे आणि निवडणुकीचे राजकारणही समजून घ्यायला हवे. कोणतीही तुलना करताना गांभीर्याने विचार करून मगच बोलायला हवे.
नेत्यांनी अभ्यासूनी प्रकटावे
नेत्यांनी अभ्यासूनी प्रकटावे sakal media
Summary

काँग्रेस नेते सलमान खुर्शिद हे वादग्रस्त विधाने करणारे पहिले नेते नाहीत. ही त्यांची वैचारिक दिवाळखोरीच आहे. मात्र शैथिल्य आलेल्या काँग्रेस नेत्यांनी इसिसबद्दल नक्कीच वाचायला हवे आणि निवडणुकीचे राजकारणही समजून घ्यायला हवे. कोणतीही तुलना करताना गांभीर्याने विचार करून मगच बोलायला हवे.

अनेक संपादक, प्रकाशक, व्यावसायिक पुस्तके लिहितात. ती पुस्तके खपण्यासाठी काही वादग्रस्त लिखाण त्यामध्ये करतात.या जोडीलाच काही राजकारणी सत्तेत असताना किंवा सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आपल्या अनुभवांवर, निरीक्षणांवर आधारित पुस्तके लिहित असतात. अशी पुस्तके जेव्हा प्रकाशित होतात तेव्हा अनेकदा वादंग ठरलेले असतात. कॉंग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी या सर्वांवर कडी करताना नुकतेच ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ हे पुस्तक लिहून वादासाठी मोठे खाद्यच पुरविले आहे. अगदी प्राइम टाईमलाही मागे टाकेल, असे हे खाद्य आहे. त्यांच्या पुस्तकातील काही ओळींनी देशभरातील वातावरण शब्दशः ढवळून निघाले आहे. अशा प्रकारांमुळे त्या त्या पक्षांना नक्कीच फरक पडतो.

खरेतर हिंदू आणि हिंदुत्व काय आहे? ते एकच आहे की भिन्न आहे? एक म्हणजे फक्त आचार आणि श्रद्धा आणि दुसरी म्हणजे त्याची राजकीय आवृत्ती. अशा परिस्थितीत हिंदू धर्मदेखील राजकीय विश्वास आहे. इस्लामवाद, ख्रिस्ती धर्म, शीख धर्म ज्याप्रमाणे मानले गेले अगदी तसेच. हिंदूंचा असा पक्ष आहे का? असेल तर तो भाजप आहे का? की हिंदुत्वाच्या वैचारिक आणि तात्त्विक पालनातून उदयाला आलेल्या संघाचा तो एक भाग आहे. त्याची तुलना इसिससोबत करायची, यावर विचारमंथन व्हावे. एक मात्र खरे धर्म आणि राजकारणाचे मिश्रण करणाऱ्या सर्व सामाजिक शक्तींमध्ये खूपसे साम्य असते. याची अनेक उदाहरणे देता येतील.

राजकीय सत्तेसाठी धर्माचा वापर करण्यात कोणीही संकोच करत नाही. ‘इतर’ धर्माच्या लोकांबद्दल असभ्य गोष्टी सांगण्याबद्दल कोणीही लाजत नाही उलट हिरीरिने भाग घेताना दिसतात. तरीही तुम्ही हिंदू धर्माची तुलना इसिससोबत कराल का? इसिसचे कट्टरवादी इतर धर्माच्या लोकांना मारतात. त्यांनी केलेले हत्याकांड, छळ, बलात्कार, गुलामगिरी, लैंगिक गुलामगिरी, फाशी किंवा शिरच्छेद...झटपट न्याय करताना सहकारी मुस्लिमांचे त्यांनी कितीतरी पटीने नुकसान केलेले आहे. इसिसला इस्लामिक धर्मशास्त्रातील सर्व राजवटींचा तिरस्कार का आहे? कारण त्यांना एकाच धाग्याने, एकाच विचाराने विणलेले संपूर्ण राज्य निर्माण करावयाचे आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जावयास तयार आहेत. बरे असे राष्ट्र निर्माण करताना त्यातून पुढे काय हे सांगण्यासाठीचा कोणताही विचार त्यांच्याकडे नाही.हे सलमान खुर्शिद यांना समजत नाही काय? हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरामसोबत करताना खुर्शिद यांनी काही तरी विचार नक्की केला असेल.मात्र हा विचार करताना सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींनी कोणतेही भाष्य करताना त्यानंतर होणाऱ्या परिणामांचा आधी विचार करणे अत्यंत आवश्यक असते.

विशेषतः तुम्ही कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असताना तरी हे भान ठेवायलाच हवे. अर्थात कॉंग्रेसमध्ये सध्या फाटाफूटच जास्त आहे. पण अशी तुलना कोणीच खपवून घेणार नाही हे नक्की. भाजप हा ‘आरएसएस’चा राजकीय चेहरा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. ते हिंदू मतांनाच आवाहन करतात. पन्नास टक्केहून अधिक हिंदूंनी त्यांना मतदान केले तर ते संपूर्ण भारतावर राज्य करू शकतात. या एवढ्या तत्त्वावरच ते काम करतात. त्यासाठी कित्येकदा ते मुस्लिमांविरोधात वक्तव्ये करतात. पण तो त्यांच्या एकूण राजकीय डावपेचांचा भाग झाला. याचा अर्थ संघाबरोबर इसिस असे म्हणता येईल का? एक मात्र खरे...अशा प्रकारे तुलना करणारे खुर्शिद हे काही पहिले नाहीत. प्रा. इरफान हबीब यांच्यासारख्या प्रख्यात डाव्या विचारवंत इतिहासकाराने २०१५ मध्येही अशीच तुलना केली होती. तेव्हाही मी लिहिताना कॉंग्रेस नेत्यांनी वाचायला हवे आणि निवडणुकीचे राजकारण शिकायला हवे, असे लिहिले होते.

मतदारांना तुलना आवडणार नाही

बहुतेक मतदारांना ही तुलना मुळीच आवडणार नाही. ज्यांनी मोदींना मत दिलेले आहे त्यांचे विचार या तुलनेने विचार बदलण्यास प्रवृत्त करतील का? मोदी हिटलर आहेत...आरएसएस हे नाझी आहेत.अशा टीका ते सहन करतील.पण मोदींवरील त्यांचा विश्वास लगेचच कमी होईल, ही शक्यता खूपच धूसर आहे. भारतवर्षाचा इतिहास आक्रमणकर्त्यांखाली १,२०० वर्षांच्या विश्रांतीनंतर २०१४ मध्ये पुन्हा सुरू झाला. हे वर्णनही अनेकांना आवडत नाही, ते त्यामुळेच.

लेबल लावण्यापूर्वी तपासणी हवी

हे असे लेबल लावण्यापूर्वी अनेक बाबी तपासाव्या लागतील. अशा वक्तव्यांमधून तुम्ही विरोधाची भडास काढली, असेच मानले जाईल. १९८४ मध्ये आणि २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या हत्या किंवा त्याआधी भिवंडी, भागलपूर, हाशिमपुरा, मुरादाबाद येथेही हत्याकांडे घडली होती. या सर्वांची तुलना ६० लाख ज्यूंना मारले त्या हत्याकांडाशी कशी करता येईल? ज्यूंसाठी ही आयुष्यभरासाठीची ठसठसती वेदनाच आहे. त्यावर कोणते तरी लेबल लावता येईल; पण यातून विवादांना उधाण येते. परंतु ते कोणत्याही युक्तिवाद किंवा प्रतिवादावर दरवाजे बंद करतात.

(अनुवाद: प्रसाद इनामदार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com