'यामुळे प्रतिमा थोडीच सुधारेल?'; शशी थरुर यांचा सचिनच्या ट्विटवरुन सरकारवर पलटवार

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 4 February 2021

इतक्या दिवसात भारतातील दिग्गज सेलिब्रिटींनी जराही 'ब्र' काढला नव्हता. कोणत्याही प्रकारची भुमिका घेण्याचे टाळले होते.

नवी दिल्ली : गेल्या 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीतही कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा निर्धार ठाम राहिलेला आहे. या इतक्या दिवसात भारतातील दिग्गज सेलिब्रिटींनी जराही 'ब्र' काढला नव्हता. कोणत्याही प्रकारची भुमिका घेण्याचे टाळले होते. मात्र, काल जागतिक पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाबाबत समर्थनाची भुमिका घेतल्यानंतर भारतातील सेलिब्रिटींनी त्याला उत्तर देण्याच्या भुमिकेत '#IndiaAgainstPropoganda' या हॅशटॅगसह ट्विट्स केले आहेत. याबाबत आता काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी मत मांडलं आहे. 

शशी थरुर यांनी म्हटलंय की, भारत सरकारने भारतीय सेलिब्रिटींना पाश्चिमात्त्य सेलिब्रिटींविरोधात प्रतिक्रिया द्यायला सांगणं हे लाजिरवाणं आहे. भारत सरकारच्या हट्टीपणामुळे आणि लोकशाहीविरोधी वर्तनाने तयार झालेल्या डागाळलेल्या भारताच्या जागतिक प्रतिमेला सुधारण्यासाठी एका क्रिकेटरच्या ट्विटचं उत्तर हा तोडगा असू शकत नाही. पेक्षा हे कृषी कायदे रद्द करा आणि शेतकऱ्यांसोबत तोडग्यासाठी चर्चा करा. तुम्हाला भारत एकत्र आलेला दिसेल. 

काल रिहाना या पॉपस्टारने शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर या विषयावर चर्चा सुरु झाली. त्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि पॉर्नस्टार राहिलेल्या मिया खलिफा हिने देखील यांसदर्भात पाठिंब्याचे ट्विट केले आहे. यानंतर सचिन तेंडूलकरने ट्विट केलं होतं. त्याने म्हटलं होतं की, भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाह्यशक्ती या दर्शक असू शकतात मात्र, ते अंतर्गत मामल्यात सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत कळतो आणि ते भारताबाबत निर्णय घेऊ शकतात. भारत म्हणून एकत्र राहुयात. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी देखील यासंदर्भात भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, ही चांगली गोष्ट आहे की, रिहाना आणि थनबर्ग परराष्ट्र मंत्रालयाला जागं करु शकतात. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला उद्देशून म्हटलं की, मानवाधिकार आणि उपजिविकेच्या मुद्यांवरुन चिंताग्रस्त असलेले लोक राष्ट्रीय सीमा ओळखत नसावेत का, हे आपल्याला हे कधी समजणार?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader shahsi tharoor sachin tendulkar tweet over farmers protest