esakal | काँग्रेसमधील वादळी बैठकीनंतर, बडे नेते देतायत डॉ. मनमोहनसिंग यांना पाठिंबा!
sakal

बोलून बातमी शोधा

congress leaders came in support for former pm dr manmohan singh

काँग्रेसमधील तरुण नेते आणि विशेषतः राहुल गांधी यांच्या गटातील नेत्यांनी बैठकीत काही स्पष्ट मते मांडली. काँग्रेसमधील मतभेदांमुळेच 2014मध्ये सत्ता गमवावी लागली, असं मत या नेत्यांनी मांडलं. 

काँग्रेसमधील वादळी बैठकीनंतर, बडे नेते देतायत डॉ. मनमोहनसिंग यांना पाठिंबा!

sakal_logo
By
रविराज गायकवाड

नवी दिल्ली : देशात 2014मध्ये सुरू झालेली मोदी लाटेची सुरुवात यापासून राजस्थानमधील काँग्रेसच्या अंतर्गत वादापर्यंत अनेक विषयांवर काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक झाली. त्यात ज्येष्ठ नेते विरुद्ध तरुण मंडळी असे गटही पहायला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे जवळपास साडे चार तास चाललेल्या चर्चेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी एकही मत व्यक्त केलं नाही. 

बड्या नेत्यांची ट्विट्स 
काँग्रेसमधीलच काही नेते भाजपविरुद्ध लढण्याचे सोडून, काँग्रेसच्या पराभवासाठी डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारला जबाबदार धरत, असल्याचं ट्विट काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केलंय. त्यावरून अनेक ज्येष्ठ नेते मंडळी डॉ. मनमोहनसिंग यांना पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियावर सरसावली आहेत. मिलिंद देवरा, शशी थरूर यांनीही ट्विट करून, डॉ. मनमोहनसिंग यांच्या समर्थनार्थ ट्विट केली आहेत. ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी काँग्रेसचा पराभव हा खूप मोठ्या राजकीय व्यूहरचनेचा परिणाम होता, असं मत ट्विटरच्या माध्यमातून मांडलंय. डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामांची माहिती देणारे 11 ट्विट्स शर्मा यांनी केले आहेत. काँग्रेसमधील तरुण नेते आणि विशेषतः राहुल गांधी यांच्या गटातील नेत्यांनी बैठकीत काही स्पष्ट मते मांडली. काँग्रेसमधील मतभेदांमुळेच 2014मध्ये सत्ता गमवावी लागली, असं मत या नेत्यांनी मांडलं. 

का बोलावली बैठक?
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन केले होते. परंतु, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळं सरकार कोसळले. पाठोपाठ, काँग्रेसचा तरुण चेहरा म्हणून ओळखले जाणारे राजस्थानातील नेते सचिन पायलट यांनीही बंड पुकरालं. परिणामी देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

वादाला सुरुवात कोठून झाली?
काँग्रेसच्या बैठकीत एका राज्यसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात मोदी सरकार ज्या मुद्द्यांवर अपयशी ठरत आहे, ते मुद्दे उचलून धरण्यात आपण अपयशी ठरत आहोत, असा मुद्दा ज्येष्ठ राज्यसभा सदस्यांनी बैठकीत मांडला. अर्थव्यवस्थेची घसरण, कोरोनासाठीच्या उपाय योजना आणि भारत-चीन तणाव, असे विषय त्यांनी मांडले. मोदींच्या लोकप्रियतेला छेद देण्यासाठीचे काँग्रेसचे प्रयत्न इतके अपुरे आणि विस्कळीत आहेत की, त्याचा प्रभावच जाणवत नाही. याचं आत्मपरिक्षण व्हावं, चर्चा, सल्लामसलत व्हावी, अशी सूचना जेष्ठ नेत्यांनी केली.

राजीव सातव यांचा मुद्दा
बैठकीत राज्यसभेचे नवनिर्वाचित सदस्य राजीव सातव यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडल्याचे समजते. 2014पासून आतापर्यंतच्या काँग्रेसच्या घसरणीचे मुद्देसूद विश्लेषण करणं, गरजेचं आहे, असं मत सातव यांनी बैठकीत मांडलं. सातव हे काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी मानले जातात. युवक काँग्रेसमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या ते राज्यसभेचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत.