Mallikarjun Kharge : द्वेषाविरोधात प्रत्येकाला लढावे लागेल; मल्लिकार्जुन खर्गे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress Mallikarjun Kharge statement Everyone has to fight against hatred of country delhi

Mallikarjun Kharge : द्वेषाविरोधात प्रत्येकाला लढावे लागेल; मल्लिकार्जुन खर्गे

नवी दिल्ली : ‘सध्या देशाच्या आत्म्याशी खेळ केला जात आहे. प्रत्येकाला या द्वेषाच्या विरोधात लढाई लढावी लागेल,’ असे आग्रही आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज केले.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त ते बोलत होते. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने काँग्रेसला संजीवनी मिळाली आहे, अशीही भावनाही त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेस स्थापनादिनानिमित्त पक्षनेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत २४, अकबर रस्ता येथील पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात खर्गे यांनी देशातील सद्यस्थितीबाबत भाष्य केले.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा पहिला टप्पा दिल्लीत पूर्ण झाला आहे. दोन जानेवारीपासून याचा दुसरा टप्पा सुरू होईल. या यात्रेबाबत काँग्रेसमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. यामुळेच काँग्रेसने स्थापना दिनाच्या व्हिडिओमध्येही या यात्रेचा समावेश केला आहे. यानिमित्त ‘जंग-ए-आझादी’पासून ते ‘भारत जोडो’च्या निमित्ताने सुरू असलेल्या ‘कनेक्ट इंडिया’ या प्रवासाचा उल्लेख करणारा व्हिडिओही खर्गे यांनी आज ट्विट केला. काँग्रेसच्या विचारसरणीला देशात मान्यता मिळत असल्याचे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादावरून दिसून आले आहे, असेही खर्गे म्हणाले.

‘पंडित नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात पाच बिगर-काँग्रेस नेते होते,’ अशा शब्दांत देशातील सध्याच्या ‘लोकशाही’वर सूचक भाष्य करताना खर्गे म्हणाले की,‘‘ देशात सध्या द्वेष वाढत आहे. महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे. पण सरकारला त्याची काही काळजी नाही. काँग्रेस पक्षाचा स्वातंत्र्यानंतरचा प्रवास हा स्वातंत्र्याचा इतिहास सांगतो. भारताच्या आसपास जगातील इतर अनेक देश स्वतंत्र झाले, पण तिथे हुकूमशाही आली. काँग्रेसच्या लोकशाहीवरील विश्वासामुळेच भारतात विकास झाला आहे. काँग्रेसने स्वातंत्र्याचा संकल्प जनतेपर्यंत नेल्याने भारत पुढे गेला. सर्वांना सोबत घेण्याचे काम आम्ही केल्याचे दिसून येते.’’

गेहलोत यांची संघ- भाजपवर टीका

जयपूर ः काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी माध्यमांशी बोलताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. ‘‘संघ आणि भाजप, संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असून, लोकशाहीचा पाया कमकुवत करत आहेत’’ असे गेहलोत म्हणाले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नेहमीच भारतातील लोकांच्या भल्यासाठी आणि प्रगतीसाठी काम केले आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक अधिकारांमध्ये हमी दिलेल्या ‘संधीच्या समानते’वर आमचा ठाम विश्वास आहे.

- मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस अध्यक्ष