
PM Narendra Modi : काँग्रेसने गरिबांची दिशाभूल केली; पंतप्रधान नरेंद्र मोदी
अजमेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अजमेर येथील सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘‘काँग्रेस पक्षाने गरिबाची दिशाभूल करत त्यांना विकासापासून वंचित ठेवले’’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
येथे आयोजित सभेत बोलताना २०१४ पूर्वी काँग्रेसच्या कार्यकाळात देशातील जनतेला हालअपेष्टा भोगाव्या लागल्याचे ते म्हणाले. ‘‘काँग्रेसने वन रॅँक वन पेन्शनच्या नावाखाली देशाच्या खऱ्या नायकांची अर्थात सैनिकांची देखील फसवणूक केली’’ अशी घणाघाती टीका त्यांनी केली. २०१४ नंतर आलेल्या भाजप सरकारने ही योजना अमलात तर आणलीच परंतु सैनिकांना थकबाकी देखील दिली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
काँग्रेसमध्ये पंतप्रधानांच्यापेक्षाही वरिष्ठ पद होते आणि ते रिमोट कंट्रोलद्वारे सरकार चालवत होते, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी सोनिया गांधी यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली. भाजप सरकारच्या काळात देशाने केलेला विकास संपूर्ण जग पाहात असून त्याचे कौतुक देखील करत आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
केंद्र सरकारने नऊ वर्षे पूर्ण केल्याबाबत बोलताना मोदी म्हणाले की, ‘‘केंद्रातील भाजप सरकारने पूर्ण केलेली नऊ वर्षे ही देशवासीयांच्या सेवेची, कुशल प्रशासनाची आणि गरिबांच्या कल्याणाची होती.’’
ब्रह्मदेवाच्या मंदिराला भेट
राजस्थान दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथील पुष्करमधील ब्रह्मदेवाच्या मंदिराला भेट देत, ब्रह्मदेवाचे दर्शन घेतले. ‘‘आपल्या शास्त्रांमध्ये ब्रह्मदेवाला निर्मितीची देवता मानले गेले आहे.त्यामुळे ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने देशात नव्या युगाची सुरुवात होत आहे’’ असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.
राजस्थानमध्ये यावर्षा अखेर विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. मागील आठ महिन्यामध्ये पंतप्रधानांचा राजस्थानमधील हा सहावा दौरा आहे. या दौऱ्यामुळे शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला हाेता.