भाजपशी जवळीकता नडली; काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

भाजपशी जवळीकता साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस आमदाराला महागात पडली आहे. 

दिसपूर - भाजपशी जवळीकता साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस आमदाराला महागात पडली आहे. संबंधित आमदाराची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसने त्यांच्या आसाममधील एका आमदारावर सहा वर्षांच्या हकालपट्टीची कारवाई केली आहे. राजदीप गोवाला असं या आमदारांचे नाव आहे.  काँग्रेसने याबाबत माहिती देताना सांगितलं की, पक्षविरोधी कृतीमुळे आमदार राजदीप गोवाला यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी म्हटलं की, काँग्रेस अध्यक्षांनी आमदार राजदीप गोवाला यांना पक्षविरोधी कृती केल्या प्रकरणी कारवाई केली आहे. पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. 

राजदीप गोवाला हे आसाममधील बराक खोऱ्यातील लखीपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही काळापासून ते भाजपच्या संपर्कात होते. त्यामुळेच पक्षाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

हे वाचा - बिहारमध्ये शिवसेना ५० जागांवर निवडणूक लढवणार 

भाजपचे नेते आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले हेमंत विश्व शर्मा यांनी काही महिन्याआधी राज्यसभा निवडणुकीवेळी असा दावा केला होता की, राजदीप गोवाला यांच्यासह काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA in Assam Rajdeep Gowala expelled from party for 6 years