काँग्रेसला धक्का, गांधी कुटुंबीयांच्या निकटवर्तीय अनु टंडन यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

राज्यातील पक्षाचे नेते स्वतःचे ब्रँडिंग करण्यात मग्न आहेत. कोणीच पक्षाच्या हिताचा विचार करताना दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. 

लखनऊ- काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या नेत्या अनु टंडन यांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा दिला आहे. टंडन यांचा राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची नव्याने उभारणी करु इच्छितात. त्याचवेळी टंडन यांनी राजीनामा दिला आहे. टंडन या उन्नावच्या माजी खासदार असून गांधी कुटुंबीयांच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत. टि्वटरवर त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. राज्यातील पक्षाचे नेते स्वतःचे ब्रँडिंग करण्यात मग्न आहेत. कोणीच पक्षाच्या हिताचा विचार करताना दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. 

मी काँग्रेससोबत गेल्या 15 वर्षांपासून जोडली गेलेली आहे. खासदार आणि एक कार्यकर्ता म्हणून जनतेची सेवा केली असल्याचे सांगताना त्यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांचे सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप केला. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक पराभूत झाल्याचे जेवढे दुःख झाले नाही त्यापेक्षा पक्षाची सध्याची स्थिती पाहून होत असल्याचे त्या म्हणाल्या.

2019 मध्ये पक्षाच्या सरचिटणीस झाल्यापासून प्रियांका गांधी या राज्यात सक्रिय झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या पक्षात काही बदल करत आहेत. परंतु, अनु टंडन यांच्या राजीनाम्याने पक्षात आलबेल नसल्याचे जाहीर झाले आहे. 

हेही वाचा- महिलेच्या छळाचा आरोप असणाऱ्या ABVP च्या नेत्याला मोदी सरकारचे 'गिफ्ट'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: up congress party leader annu tandon resign