महिलेच्या छळाचा आरोप असणाऱ्या ABVP च्या नेत्याला मोदी सरकारचे 'गिफ्ट'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

अशा पद्धतीची वर्तणूक करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना हे प्रोत्साहन आहे का, असा सवाल विचारण्यात आला आहे.

चेन्नई- चेन्नईत काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) नेते तथा डॉ. सुब्बय्या षण्मुगम यांच्यावर एका महिलेचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. षण्मुगम यांनी एका महिलेच्या दारासमोर मूत्र विसर्जन केले आणि त्यांच्या घरावर वापरण्यात आलेले मास्क आणि कचरा फेकल्याचा आरोप आहे. केंद्र सरकारने आता डॉ. षण्मुगम यांची मदुराई येथील एम्सच्या संचालक मंडळावर नेमणूक केली आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात याला विरोध होताना दिसत आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, डॉ. षण्मुगम यांचा मदुराई एम्सच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे. षण्मुगम हे किलपॅक मेडिकल कॉलेजच्या आँकोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. ते तामिळनाडू एबीव्हीपीचेही प्रमुख आहेत. 

दरम्यान, षण्मुगम यांनी एका वाहिनीशी बोलताना आपण कोणताच गुन्हा केला नसल्याचे म्हटले. आरोप किरकोळ आहेत. माझी नेमणूक ही माझ्या शैक्षणिक योग्यतेवर झाली आहे. मी पूर्वीपासूनच इतर एम्स आणि आयआयटीचा सदस्य आहे, असे सांगितले. 

हेही वाचा- Bihar Election: 'राहुल गांधी भारतापेक्षा पाकिस्तानच्या टीव्हीवर जास्त दिसतात'

यावर द्रमुक नेत्या कनिमोळी यांनी टि्वट करुन आपला विरोध दर्शवला आहे. अशोभनीय वर्तणुकीला हे समर्थन आहे का? अशा पद्धतीची वर्तणूक करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना हे प्रोत्साहन आहे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

यावर्षी जुलैमध्ये हा प्रकार घडला होता. षण्मुगम हे राहत असलेल्या अपार्टमेंटमधील पार्किंग स्लॉटवरुन वाद झाला होता. त्यानंतर अनेकवेळा पीडित महिलेच्या कुटुंबांबरोबर त्यांनी गैरवर्तणूक केली होती. 

हेही वाचा- #Positive Story - भीक मागणं सोडून दिव्यांग महिलेनं सुरू केला फळविक्रीचा व्यवसाय

या संपूर्ण प्रकरणाची माहिती सांगताना पीडित महिलेने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचे सांगितले. आम्ही पोलिसांकडे तक्रार घेऊन गेलो होतो. त्यावेळी पोलिसांनी डॉक्टरांची वाट पाहिली आणि आमची तक्रार खोटी असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abvp leader subbiah shanmugam appointed to aiims board madurai who allegedly harassed woman