Loksabha 2019 : मोदीजी, म्हणाल तिथे राफेलवर चर्चा करू : राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले असून, राफेल करारात भ्रष्टाचार झालेला आहे. या प्रकरणाची चौकशी झाली तर नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी नक्की अडकतील. हवाई दलाचे पैसे चोरून त्यांनी अनिल अंबानींना दिले आहेत. मी मोदींना रोज आव्हान देत आहे. या प्रकरणावर माझ्यासोबत चर्चा करा.

अमेठी : राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालामुळे हे सिद्ध झाले आहे, की चौकीदारच चोर आहे. त्यामुळे मी मोदींना खुले आव्हान देतो की तुम्ही म्हणाल तिथे मी तुमच्याशी राफेलवर चर्चा करण्यास तयार आहे, असे खुले आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. 

राहुल गांधी यांनी आज (बुधवार) अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी त्यांनी काढलेल्या रोड शो मधून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत आई सोनिया गांधी, बहिण प्रियांका गांधी आणि तिचे पती रॉबर्ट वद्रा उपस्थित होते. 

राहुल गांधी म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले असून, राफेल करारात भ्रष्टाचार झालेला आहे. या प्रकरणाची चौकशी झाली तर नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी नक्की अडकतील. हवाई दलाचे पैसे चोरून त्यांनी अनिल अंबानींना दिले आहेत. मी मोदींना रोज आव्हान देत आहे. या प्रकरणावर माझ्यासोबत चर्चा करा. आपण देशासमोर 15 मिनिटे चर्चा करू. देश राफेल, भ्रष्टाचार, नोटाबंदी, अमित शहा यांच्या पुत्राबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. मोदींनी सांगेल तिथे मी त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहे. चौकीदाराला माहिती आहे, ते भारताच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही. चौकीदार चोर है हे सिद्ध झाले आहे. सर्वोच्च न्यायालयानेच आता मान्य केले आहे, की चौकीदारच चोर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress president Rahul Gandhi targets PM Narendra Modi on Rafale Deal