Congress Presidential Election: अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी शशी थरुर यांची खरगेंवर मोठी टीका, म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Presidential Election: अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी शशी थरुर यांची खरगेंवर मोठी टीका, म्हणाले..

Congress Presidential Election: अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी शशी थरुर यांची खरगेंवर मोठी टीका, म्हणाले..

काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरुर आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यात थेट लढत होत आहे. खरगे यांना मिळणारा पाठिंबा पाहता तेच नवे अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. याचदरम्यान, शशी थरुर यांनी एक मोठं विधान केलंय. शशी थरुर यांनी आपण जर पक्षाचे अध्यक्ष झालो, तर कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार बदल घडवू असा दावा केला आहे. थरुर म्हणाले “आम्ही शत्रू नाही आणि हे काही युद्ध नाही. पक्षाच्या भविष्यासाठी ही निवडणूक आहे. खरगे पक्षाच्या पहिल्या तीन नेत्यांमधील आहेत. त्यांच्यासारखे नेते पक्षात कोणताही बदल आणू शकणार नाहीत. सध्या आहे तीच व्यवस्था पुढे कायम ठेवली जाईल. कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी बदल घडवू शकतो”.

खरगे पक्षात अपेक्षेप्रमाणे कोणताही बदल घडवणार नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे. खरगे आहे तीच व्यवस्था पुढे कायम ठेवतील असंही थरुर यांनी सांगितलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माघार घेतल्यामुळे आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री के एन त्रिपाठी यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्याने शशी थरुर आणि खरगे यांच्यातच ही लढत होणार आहे. तर दुसरीकडे राज्यात राजकीय तणाव निर्माण झाल्यामुळे निवडणुकीतून माघार घेतलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मल्लिकार्जून खरगे यांना पाठिंबा दर्शवला आहे.

हेही वाचा: Congress : जुनी काँग्रेस हवी असेल तर खर्गेंना मत द्या, नव्या बदलासाठी मी उभा आहेच - शशी थरूर

याआधी मल्लिकार्जून खरगे यांनी आपण कोणालाही विरोध करण्यासाठी नाही, तर पक्ष मजबूत करण्यासाठी निवडणूक लढत असल्याचं स्पष्ट केलं. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी विनंती केल्यानेच आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

अध्यक्षपद उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. उमेदवारांची अंतिम यादी 8 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. बिनविरोध निवडणूक न झाल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होतील.

हेही वाचा: Mallikarjun Kharge: कोण आहेत मल्लिकार्जून खर्गे?