esakal | ''फडणवीसांचे कृत्य मानवतेच्या विरोधातील''; प्रियांका गांधींनी शेअर केला VIDEO
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka gandhi devendra fadanvis

''फडणवीसांचे कृत्य मानवतेच्या विरोधातील''; प्रियांका गांधींनी शेअर केला VIDEO

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली- देशात लोक रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी आकांत करीत असताना महाराष्ट्रात जबाबदारीच्या पदावर राहिलेले भाजपचे नेते या इंजेक्शनच्या साठेबाजीला मदत करीत आहेत. त्यांचे हे कृत्य मानवतेच्या विरोधातील आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.प्रियांका यांनी यासंबंधी ट्विट करताना त्यासोबत एक मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात विरोधी पक्ष नेते फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर एका पोलिस अधिकाऱ्याला जाब विचारत असल्याचे दिसून येत आहे.

रेमडेसिव्हीरच्या निर्यातीला बंदी असूनही एक पुरवठादार त्याची कथित निर्यात करीत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर सायंकाळी भाजप नेते त्याच्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. भाजप नेत्यांच्या विनंतीवरून हे पुरवठादार महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर देण्यास तयार असूनही त्यांचा छळ पोलिस करीत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान, रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन राज्यात सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. भाजपा दमणमधल्या ज्या ब्रूक फार्मा कंपनीकडून ५० हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन विकत घेणार होती, त्याच कंपनीच्या संचलाकांना विलेपार्ले पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना या कारवाईबद्दल जाब विचारला होता.

हेही वाचा: 'स्मशान आणि कब्रस्तान...'; राहुल गांधींचं टीकास्त्र

पोलिसांचं काय म्हणणं आहे?

"आम्हाला आमच्या नेटवर्कमधून माहिती मिळाली होती की, दमणमध्ये बनवलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा साठा मुंबईत स्टोअर करण्यात आला असून एअर कार्गोने मुंबईबाहेर पाठवणार असल्याची माहिती मिळाली होती. कोरोनावरील उपचारांमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन किती महत्त्वाचे आहे, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. या इंजेक्शनचा तुटवडा असून रेमडेसिव्हीरला सरकारने निर्यातबंदी केली आहे. आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही लगेच पाऊल उचलले. आम्ही फार्मा कंपनीच्या मालकाला बोलवून घेतले व साठा कुठे केला आहे? त्याबद्दल विचारले. लोकांच्या हितांच्या दृष्टीने आम्ही चांगल्या भावनेतून ही कारवाई केली" असे झोन आठचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी सांगितले.