प्रियांका गांधींच्या जुन्या वक्तव्यावर काँग्रेसची सारवासारव; भाजपवर केले आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 19 August 2020

अंतर्कलह आणि राहुल गांधींच्या नेतृत्वावर येणाऱ्या उलटसुलट प्रतिक्रियांमुळे कोंडी झालेल्या कॉंग्रेसला प्रियांका गांधी वाड्रा यांच्या वक्तव्यावरून सारवासारव करावी लागली आहे.

नवी दिल्ली- कॉंग्रेसचे नेतृत्व गांधी कुटुंबाबाहेर व्यक्तीकडे सोपवावे, या प्रियांकाच्या जुन्या विधानावर उद्भवलेल्या वादळामुळे कोंडी झालेल्या कॉंग्रेसने "भाजप प्रायोजित प्रसारमाध्यमांचा हा खेळ आहे" असा आरोप केला आहे. तसेच राहुल गांधीवर स्तुतीसुमने उधळताना तेच पुन्हा नेतृत्व करतील, असे सूचक संकेतही दिले आहेत.

अंतर्कलह आणि राहुल गांधींच्या नेतृत्वावर येणाऱ्या उलटसुलट प्रतिक्रियांमुळे कोंडी झालेल्या कॉंग्रेसला प्रियांका गांधी वाड्रा यांच्या वक्तव्यावरून सारवासारव करावी लागली आहे. कॉंग्रेसचे मुख्यप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एका पाठोपाठ एक असे तीन ट्विट करून गांधी कुटुंबाची जोरदार पाठराखण केली. प्रियांकांच्या वक्तव्याचे वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर सुरजेवाला यांनी सरळसरळ भाजप प्रायोजित असल्याचा ठपका ठेवला. सत्ताधारी भाजपच्या इशाऱ्यावर प्रायोजिक माध्यमांना, प्रियांका गांधी यांच्या एक वर्षापूर्वीच्या (१ जुलै २०१९) वक्तव्यावर अचानक रस वाटणे, यामागचा खेळ आम्ही समजू शकतो, असं ते म्हणाले आहेत.

प्रणव मुखर्जींची प्रकृती खालावली; रुग्णालयाने दिली माहिती

आज वेळ आहे मोदी-शहा यांनी भारतीय लोकशाहीवर चालविलेल्या क्रूर हल्ल्याचा मुकाबला करण्याची आणि निडरपणे त्यांच्यासमोर उभे राहण्याची. राहुल गांधींनी अथक संघर्ष आणि संकल्पाने या लढाईचे नेतृत्व केले असून कॉंग्रेसचे लक्षावधी कार्यकर्ते याचे साक्षीदार आहेत. प्रतिकूल परिस्थितीची आणि मोदी सरकारकडून होणाऱ्या विकृत हल्ल्यांची त्यांनी तमा बाळगली नाही. याच निडरपणाची आणि दुर्दम्य साहसाची कॉंग्रेसलाच नव्हे तर देशालाही सर्वाधिक गरज आहे, असे म्हणत सुरजेवाला यांनी राहुल यांच्याकडे पुन्हा नेतृत्वपद सोपविले जाण्याचेही संकेत आडवळणाने दिले.

34 प्रवाशांसह बसच्या अपहरण नाट्याला नवं वळण

काय म्हटले होते प्रियांकांनी

लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या पदासाठी प्रियांका गांधींच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. याच दरम्यान जुलै २०१९ ला प्रियांका गांधींनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती कॉंग्रेसची अध्यक्षपदी आली तर तिच्यासोबत काम करताना अडचण येणार नाही, असे म्हटले होते. तसेच आपण कॉंग्रेस अध्यक्षपद स्वीकारणार नसून उत्तर प्रदेशात पक्षवाढीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचेही प्रियांकांनी म्हटले होते. त्यांची ही मुलाखत "इंडिया टुमारो- कॉन्वहर्सेशन विथ द नेक्स्ट जनरेशन ऑफ पॉलिटिकल लिडर्स” या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात आहे. त्याआधारे प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून वाद पेटल्यानंतर कॉंग्रेसला हा खुलासा करावा लागला आहे. या पुस्तकामध्ये प्रियांका गांधींव्यतिरिक्त राहुल गांधी, आदित्य ठाकरे, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, राज्यवर्धन राठोड आदी नेत्यांच्याही मुलाखती आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Priyanka Gandhi's old statement Allegations made against BJP