राहुल हे ‘भारत जोडो’चे प्रतीक; दिग्विजय सिंह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Bharat Jodo Yatra

राहुल हे ‘भारत जोडो’चे प्रतीक; दिग्विजय सिंह

तुरुवुकेरे : भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी यांचे नवे रूप लोकांसमोर येणार असून, राहुल गांधी हे ‘भारत जोडो’चे प्रतीक बनले आहेत असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिग्विजयसिंह यांनी रविवारी मुलाखत दिली. ते म्हणाले, ‘‘भारत जोडो यात्रेचे पक्षासाठी सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. गेल्या अनेक वर्षांनंतर, काँग्रेस देशातल्या ग्रामीण आणि दुर्गम भागांत पोहोचत आहे आणि विशेष म्हणजे या संपूर्ण यात्रेमध्ये राहुल गांधी हे लोकांबरोबर चालत असल्याने लोक प्रभावित झाले आहेत.’’

‘‘या देशात त्याग करणाऱ्या व्यक्ती कायमच आदरणीय ठरतात, सोनिया गांधी यांनी ज्याप्रमाणे पंतप्रधान पदाचा त्याग केला त्याचप्रमाणे, राहुल गांधी हे देखील त्याग करत आहेत. ऊन, वारा पावसाची तमा न बाळगता पद यात्रेत चालत आहेत.

विविध प्रकारच्या अपप्रचारांशी लढा देत आहेत,’’ असे दिग्विजय सिंह म्हणाले. ‘‘राहुल गांधी यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो, त्यांनी एखादा संकल्प केला तर ते तो पूर्णत्वास नेतात, त्यात त्यांना कोणी रोखू शकत नाही,’’ असे प्रतिपादन दिग्विजयसिंह यांनी केले. राहुल गांधी हे गुणी आणि अत्यंत आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

दरम्यान, भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कोल्हापूर येथे दसरा चौकात काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले, ‘‘शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी समतेच्या विचारांची मशाल पेटविली. हीच मशाल घेऊन समतेचा विचार पेरण्याचे काम राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेतून करीत आहेत.’’

पक्षाला घरचा आहेर

या मुलाखती दरम्यान दिग्विजय सिंह यांनी पक्षातील कमजोर दुव्यांवर देखील उघड भाष्य केले. ‘‘भाजपच्या तुलनेत काँग्रेस पक्ष हा संघटनात्मक दृष्ट्या दुबळा असून, पक्षात विचारधारा आणि पक्षनेतृत्त्वाबाबतच्या निष्ठेचा अभाव आहे,’’ असे दिग्विजय सिंह म्हणाले.