सुशीलकुमार शिंदेंना वगळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दगडू ते सुशीलकुमार अन्‌ कोर्टातील पट्टेवाला ते केंद्रीय मंत्री!

सुशीलकुमार शिंदेंना वगळले

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिस्तपालन समितीचा विस्तार केला आहे. ए. के. अँटनी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमण्यात आली असून गेल्या काही वर्षांपासून सदस्य राहिलेले महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना डच्चू देण्यात आला.

जी-२३ या असंतुष्ट गटाच्या नेत्यांचे राहुल गांधीं यांच्या विरोधातील बंड, संघटनात्मक निवडणुकीची आक्रमक मागणी, केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राहुल गटाचा जुन्या नेत्यांविरुद्धचा हल्लाबोल आणि त्यांना भाजपचे हस्तक संबोधणे अशा घडामोडी घडल्या. त्यानंतर पंजाबमध्ये राजकीय नाट्य घडले. कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले. राहुल-प्रियांका यांची पसंती असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले, पण त्यांनी राजीनामा दिला.

यानंतर सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून काँग्रेस नेतृत्वाला लक्ष्य केले जाणे आणि त्यानंतर त्यांच्या घरावर काँग्रेसमधील एका गटाने हल्ला करणे, या हल्ल्याचा गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, पी. चिदंबरम यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी निषेध करत दोषींविरुद्ध कारवाईची सोनिया गांधींकडे मागणी करणे, त्यानंतरही गांधी कुटुंबीयांकडून भाष्य न होणे यासारख्या घटना घडल्या. या घडामोडी पाठोपाठ घडूनही शिस्तपालन समितीकडून त्याची दखल घेतली गेली नाही. यामुळे समितीविषयी सवाल उपस्थित होत होते. या पार्श्वभूमीवर समितीची फेररचना करण्यात आली आहे. याआधी मोतीलाल व्होरा, अँटनी आणि शिंदे या सदस्यांचा समावेश होता. व्होरा यांच्या निधनानंतर अँन्टनी आणि शिंदे हे दोघेच उरले होते. आता नव्या समितीत अंबिका सोनी, केरळचे प्रभारी सरचिटणीस तारिक अन्वर, दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष जे. पी. अग्रवाल तसेच कर्नाटकचे माजी प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वर यांचा समावेश करण्यात आला आहे.

loading image
go to top