भाजपचे ऑपरेशन लोटस सुरु; काँग्रेसचे आमदार रात्रीपासून गायब?

वृत्तसंस्था
बुधवार, 4 मार्च 2020

काँग्रेसने भाजपवर आरोप करत म्हटले आहे, की काँग्रेसचे मोठे नेते आणि आदिवासी आमदार बिसाहुलाल सिंग यांच्यासह सुमारे आठ आमदारांना भाजप नेत्यांसमवेत गुरुग्राममधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशात मंगळवारी रात्रीपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याने मुख्यमंत्री कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. भाजपने ऑपरेशन लोटस सुरु केले असून, काँग्रेसचे काही आमदार गायब असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसने भाजपवर आरोप करत म्हटले आहे, की काँग्रेसचे मोठे नेते आणि आदिवासी आमदार बिसाहुलाल सिंग यांच्यासह सुमारे आठ आमदारांना भाजप नेत्यांसमवेत गुरुग्राममधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. काँग्रेसच्या आमदारांसह बसपचे आमदार रामबाई हेदेखील हॉटेलमध्ये आहेत. भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

मंगळवारी रात्री उशीरा कमलनाथ सरकारचे दोन मंत्री जयवर्धन सिंह आणि जीतू पटवारी गुरुग्राम येथे पोहोचले. तेथून त्यांनी काँगेस आमदारांना सुरक्षित ठिकाणी नेल्याचे सांगण्यात येत आहे. दिग्विजय सिंह हेदेखील हॉटेलमध्ये पोहोचले, तिथे हॉटेल प्रवेशाबद्दल व्यवस्थापनांशी त्यांचा बराच वाद झाला.

दिग्विजय सिंह यांनी नुकताच भाजपवर सरकार अस्थिर करत असल्याचा आरोप केला होता. हरियानामधील भाजप सरकारमुळे भाजप नेत्यांनी हे हॉटेल निवडल्याचे सांगण्यात येत  आहे. मध्यरात्रीपासून मध्य प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने यापूर्वी कर्नाटकमध्ये असेच ऑपरेशन लोटस राबवून काँग्रेस-जेडीएस सरकार पाडले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress says 8 Madhya Pradesh MLAs confined in Gurgaon hotel