
Congress : कर्नाटकमध्ये भाजपचा धुव्वा उडणार? पक्षांतर्गत सर्व्हेत काँग्रेसला २२४ पैकी १४० जागा
नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभेच्या एकूण २२४ जागांपैकी १४० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळणार असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी केला. आगामी काळात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे अनेक विद्यमान आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही शिवकुमार यांनी केला.
भाजपचे दोन माजी आमदार आणि म्हैसूरचे माजी महापौर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या नेत्यांमध्ये कोल्लेगाळ्याचे आमदार जी. एन. नानजुंदस्वामी, विजापूरचे माजी आमदार मनोहर ऐनापूर आणि म्हैसूरचे माजी महापौर पुरुषोत्तम यांचा समावेश आहे.
२०२२ च्या गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच भाजपला कर्नाटकात निवडणुका घ्यायच्या होत्या, पण नंतर त्यांनी माघार घेतली, असा दावाही शिवकुमार यांनी केला. महापुराप्रमाणे जिल्हा स्तरावर अनेक नेते पक्षात प्रवेश करत आहेत, काही मान्यवर नेते पक्षात प्रवेश करत आहेत. जनमत काँग्रेसच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले, असंही शिवकुमार यांनी नमूद केलं.
"आमच्या आधीच्या सर्वेक्षणात आम्ही 136 जागांचा अंदाज वर्तवला होता, आता आमचे सर्वेक्षण आम्हाला 140 जागा मिळतील अस सांगत आहे. बदलाला सुरुवात झाली आहेत. हे आम्ही राज्यभर केलेल्या यात्रेदरम्यान अनुभवल्याचं ते म्हणाले.
शिवकुमार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला आता ५० दिवस शिल्लक आहेत. २०२२ च्या गुजरात निवडणुकीनंतर भाजपला कर्नाटकमध्ये निवडणुका घ्यायच्या होत्या. त्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी ही चर्चा केली होती, पण त्याला उशीर करण्यात आला. याचे कारण म्हणजे, भाजपला वाटते की जेवढे दिवस निवडणुका लांबतील, तेवढच ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.