'कोल्ड प्ले'वरून कॉंग्रेसचे मोदींवर शरसंधान

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मोदी एक 'सेल्फ स्टाइल' रॉकस्टार
स्वत:हून स्वत:ला रॉक स्टार अशी उपाधी देणाऱ्या मोदींनी या कार्यक्रमाला संबोधित करून एकाअर्थी देशातील दु:खी जनतेला चांगलेच नाचवले. संसदेचे कामकाज सोडून अशा कार्यक्रमांना संबोधित करणे. हाच का तुमचा काळ्या पैशाविरोधात लढण्याचा मार्ग, असा प्रश्नही सुरजेवाला यांनी उपस्थित केला.

नवी दिल्ली : मुंबईत आयोजित ग्लोबल सिटिझन्स फेस्टिव्हल या कार्यक्रमावरून आज कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. एकीकडे गरीब जनता पैशासाठी रांगेत उभी असताना दुसरीकडे पंतप्रधानांकडे मात्र अशा कार्यक्रमांसाठी वेळ आहे, अशी टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

फेस्टिव्हलअंतर्गत पार पडलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजारो तरुणांशी संवाद साधला होता. ""नोटाबंदीमुळे जनतेसमोरील समस्या वाढल्या आहेत आणि दुसरीकडे हा कार्यक्रम होत आहे,'' असे ट्‌विट राहुल गांधी यांनी केले आहे. नोटाबंदीमुळे जनता हतबल झाली असून, लाखो नागरिक स्वत:चे पैसे काढण्यासाठी रांगेत उभे आहेत. अशा वेळी मोदी या कार्यक्रमाला संबोधित करण्यात व्यस्त होते. यादरम्यान 55 नागरिकांचा मृत्यू झाला असून संसदेसाठी वेळ नसलेल्या मोदींकडे मात्र, अशा कार्यक्रमात संवाद साधण्यासाठी बरा वेळ आहे, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सुरजेवाला म्हणाले, ""सरकार अशा व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा कार्यक्रमांद्वारे चालत नाही, तर ती संसद व देशातील जनतेप्रती एक जबाबदारी असते. जनता गेल्या 11 दिवसांपासून रांगेत उभी आहे. लोकांच्या खात्यावर पैसे आहेत; मात्र, बॅंका व एटीएममध्ये ते शिल्लक नाहीत. नोटाबंदीप्रकरणी पंतप्रधानांनी उपस्थित राहून प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी राज्यसभेने केली आहे. मात्र, त्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.''

मोदी एक "सेल्फ स्टाइल' रॉकस्टार
स्वत:हून स्वत:ला रॉक स्टार अशी उपाधी देणाऱ्या मोदींनी या कार्यक्रमाला संबोधित करून एकाअर्थी देशातील दु:खी जनतेला चांगलेच नाचवले. संसदेचे कामकाज सोडून अशा कार्यक्रमांना संबोधित करणे. हाच का तुमचा काळ्या पैशाविरोधात लढण्याचा मार्ग, असा प्रश्नही सुरजेवाला यांनी उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress targets modi over cold play