तुम्ही झुंडबळींचे समर्थक का विरोधक?; सरसंघचालकांवर काँग्रेसचा निशाणा 

वृत्तसंस्था
Wednesday, 9 October 2019

सरसंघचालकांनी झुंडबळी हा शब्द भारतीय परंपरेतील नसल्याचा युक्तिवाद करताना काही लोक जाणूनबुजून या प्रकारावरून भारत आणि हिंदू समाजाला बदनाम करू पाहत असल्याचा युक्तिवाद केल्याने राजकीय पटलावर नवीन वादाला तोंड फुटले.

नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरला दसरा मेळाव्यात झुंडबळीबद्दल केलेल्या व्यक्तव्याचा मंगळवारी (ता. 8) काँग्रेस पक्षाने खरपूस समाचार घेताना निष्पाप माणसे, महिला आणि मुलांचे बळी घेणाऱ्या झुंडबळीचे ते समर्थक की विरोधक आहेत, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. 

सरसंघचालकांनी केलेली विधाने अतिशय धक्कादायक आहेत. झुंडबळी हा युरोप किंवा भारत, इंग्रजी किंवा हिंदी भाषा असा मुद्दा अजिबात नसून निष्पाप जीवांचे झुंडबळीतून जाणारे प्राण हे मानवतेच्या कोणत्याच व्याख्येत बसत नाहीत. भाषा हा इथे अजिबात मुद्दा नसल्याची प्रखर टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली. भागवत यांचे वक्तव्य अतिशय दुर्दैवी असून, राष्ट्रहित लक्षात घेऊन भागवत यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. राष्ट्रीय हित तसेच जगाचा देशाकडे पाहण्याचा बदललेल्या दृष्टिकोनामुळे तुम्ही झुंडबळीच्या बाजूने आहेत का विरोधात आहात, याबाबत भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे. आता तुम्ही सफाई द्याच, अशी मागणी केली.

सरसंघचालकांनी झुंडबळी हा शब्द भारतीय परंपरेतील नसल्याचा युक्तिवाद करताना काही लोक जाणूनबुजून या प्रकारावरून भारत आणि हिंदू समाजाला बदनाम करू पाहत असल्याचा युक्तिवाद केल्याने राजकीय पटलावर नवीन वादाला तोंड फुटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress targets RSS chief Mohan Bhagwat