"प. बंगालमधून राज्यघटना संपली"; हिंसाचारावरून राज्यपालांचे ताशेरे!

राजभवनात ४३ जणांचा शपथविधी, खाते वाटप उद्या होण्याची शक्यता
Governer Jagdeep Dhankar
Governer Jagdeep DhankarPhoto by ANI

कोलकता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्या मंत्रिमंडळातील ४३ मंत्र्यांचा शपथविधी आज राजभवनामध्ये साधेपणाने पार पडला. राज्यपाल जगदीप धनकर (Governer Jagdeep Dhankar) यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या कार्यक्रमानंतर बोलताना राज्यपालांनी राज्यातील हिंसाचाराबद्दल पुन्हा एकदा जाहीरपणे चिंता व्यक्त केली. "हिंसाचार संपावा म्हणून राज्य सरकारचं काम करताना दिसत नाही. पश्‍चिम बंगालमध्ये राज्यघटना संपली आहे. रात्री हिंसाचाराच्या बातम्या मिळतात सकाळी मात्र सगळंकाही ठीक असल्याचे सांगितले जातं," असं धनकर म्हणाले. तत्पूर्वी राज्यपालांनी ५ मे रोजी ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देखील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता तसेच परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी मुख्यमंत्र्यांनी उपाय योजावेत असं आवाहन केलं होतं. आता अन्य मंत्र्यांच्या शपथविधीदरम्यान देखील पुन्हा एकदा राज्यातील हिंसाचाराचा मुद्दा गाजला आहे. (Constitution ends in West Bengal Governors remarks on violence)

उद्या होणार खाते वाटप

तृणमूलचे अन्य तीन नेते अमित मित्रा, व्रत्य बसू आणि रथीन घोष यांनी व्हर्च्युअली शपथ घेतली. पार्थ चॅटर्जी, सुव्रत मुखर्जी, फिरहाद हकीम आणि सधन पांडे या नेत्यांचाही शपथ घेतलेल्यांमध्ये समावेश आहे. आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अन्य बडे प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. उद्या (ता.११) रोजी खाते वाटप होण्याची शक्यता आहे. शपथ घेतलेल्यांमध्ये २४ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्र्यांचा (स्वतंत्र कार्यभार) समावेश आहे.

राज्यपालांनी मांडलेले मुद्दे

  • राज्य सरकारने जनतेचा विश्‍वास पुन्हा मिळवावा

  • कायद्याची चौकट मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी

  • हिंसाचारावर राज्य सरकारची भूमिका मला ज्ञात

  • ३ मे रोजीच अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला

  • बड्या अधिकाऱ्यांनी अद्याप उत्तर दिलेलं नाही

  • मुख्य सचिवांना फोन करून बोलवावे लागते

  • हिंसाचारग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी हेलिकॉप्टर दिले नाही

  • घटनात्मक मार्गाने पश्‍चिम बंगाल सांभाळणे अवघड

  • विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्राण गमवावे लागतात

सुवेंदू अधिकारी विरोधी पक्षनेतेपदी

भाजपने आज सुवेंदू अधिकारी यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड केली. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली. येथील पक्ष कार्यालयामध्ये आमदारांशी संवाद साधल्यानंतर अधिकारी यांच्याकडे विधिमंडळ नेते पदाची धुरा सोपविण्याची घोषणा करण्यात आली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अधिकारी यांनी तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना १९०० मतांनी पराभूत केल्याने पक्ष दरबारी त्यांचे वजन वाढले होते. अधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंदीग्रामनंतर आता विधिमंडळामध्येही ममता विरुद्ध अधिकारी हा संघर्ष रंगणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com