Breaking : 'वादग्रस्त पुस्तकाशी संबंध नाही'; भाजपचे 'हात वर', तर लेखकाचा माफीनामा 

टीम ई-सकाळ
सोमवार, 13 जानेवारी 2020

'जयभगवान गोयल यांनी वैयक्तिकरीत्या पुस्तक प्रकाशित केले होते. त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. पुस्तकामुळे भावना दुखावल्या असतील, तर त्यांनी माफीही मागितली आहे. गोयल यांनीच ते पुस्तक मागे घेतले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणारे वादग्रस्त पुस्तक लेखक जयभगवान गोयल यांनी मागे घेतल्याची माहिती भाजपने आज रात्री दिली. या संदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहे भाजपची भूमिका?
'जयभगवान गोयल यांनी वैयक्तिकरीत्या पुस्तक प्रकाशित केले होते. त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. पुस्तकामुळे भावना दुखावल्या असतील, तर त्यांनी माफीही मागितली आहे. गोयल यांनीच ते पुस्तक मागे घेतले आहे. त्यामुळे आता वादावर पडदा पडेल,' असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पीटीआयशी बोलताना स्पष्ट केले. गोयल यांनी "आज के शिवाजी : नरेंद्र मोदी' या शीर्षकाखाली पुस्तक लिहिले व नुकतेच प्रकाशित केले. या पुस्तकात मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी त्यावर टीकेची झोड उठविली होती.

आणखी वाचा - वादग्रस्त पुस्तकावर खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले?

फडणवीस म्हणाले....
या पुस्तकाबद्दल बोलताना भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, "छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही आणि ती कुणी करूही शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील एक भक्कम, मजबूत नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात भारताचा लौकिक संपूर्ण जगात वाढत आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभही छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊनच केला होता आणि शिवछत्रपतींच्याच मार्गाने आपली वाटचाल असेल,' असे स्पष्ट केले आहे. 

शिवाजी महाराजांप्रमाणे मोदी यांनी अशक्‍य कामे शक्‍य केली आहेत, एवढेच मला पुस्तकातून सांगायचे होते. पुस्तकामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर माफी मागण्याची तयारी आहे.
- जयभगवान गोयल, वादग्रस्त पुस्तकाचे लेखक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: controversial books on narendra modi withdrawn by author bjp reaction prakash javdekar