नक्की किती कोरोनामुक्त?; हर्षवर्धन सांगतात ३५ लाख, सचिव म्हणतात ३९ लाख! 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 16 September 2020

देशात सध्या ६९०० दशलक्ष टन ऑक्सिजनचे उत्पादन होत असून त्याची काहीही कमतरता नाही अशी माहिती त्यांनी दिली. देशातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढत असून मागील एका आठवड्यात ७६ लाख चाचण्या करण्यात आल्याचे ‘आयसीएमआर’ने सांगितले. 

नवी दिल्ली - कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३५ लाख ४२ हजार ६६३ असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज राज्यसभेत सांगितले. मात्र त्यानंतर जेमतेम ५ तासांनी त्यांच्याच मंत्रालयाच्या मुख्य सचिवांनी हा आकडा ३९ लाख असल्याचे सांगितले. भारतात इतक्‍या कमी काळात ४ ते ५ लाख रूग्ण बरे होत असतील तर साऱ्या जगानेच हे ‘इंडिया कोरोना मॉडेल’ अंगीकारायला हवे अशी चर्चा त्यामुळे रंगली. 

राज्यसभेत हर्षवर्धन म्हणाले की, देशातील रूग्णसंख्या ४५ लाख ६२ हजार ४१४ आहे. त्यातील ९२ टक्के लोकांना अगदी सौम्य लक्षणे आहेत. केवळ ५.८ टक्के लोकांनाच ऑक्सि‍जन उपचारांची गरज लागली असून केवळ १.७ टक्के रूग्ण अतिदक्षता विभागात आहेत. मृतांची संख्या ७६,२७१ आहे. केंद्राने वेळेवर लॉकडाऊन लावल्यामुळे अंदाजे १४ ते २९ लाख रूग्णसंख्या कमी झाली व तब्बल ३८ हजार लोकांचे जीव वाचविता आले. आतापावेतो एकूण रूग्णांच्या ७७.६५ टक्के म्हणजे ३५,४२,६६३ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मुख्यत: महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू ,कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्‍चिम बंगाल, तेलंगण, ओडिशा, आसाम, केरळ आणि गुजरातमधूनच सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हर्षवर्धन यांच्या निवेदनानंतर आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी माहिती देताना, देशात ३८ लाख ५० हजारांहून जास्त लोक बरे झाले आहेत. आज संपलेल्या एका आठवड्यात महाराष्ट्रात सर्वाधिक ४०९ लोक दगावल्याचेही त्यांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑक्सिजनची कमतरता नाही
देशात ऑक्‍सीजनची अजिबात कमतरता नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले. महाराष्ट्रासह चारच राज्यांत प्रत्येकी ५० हजारहून जास्त रूग्ण आहेत व त्यातील सर्वाधिक २९ टक्के रूग्ण महाराष्ट्रात आहेत, असे आरोग्य सचिव राजेश भूषण सांगितले. देशात सध्या ६९०० दशलक्ष टन ऑक्सिजनचे उत्पादन होत असून त्याची काहीही कमतरता नाही अशी माहिती त्यांनी दिली. देशातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढत असून मागील एका आठवड्यात ७६ लाख चाचण्या करण्यात आल्याचे ‘आयसीएमआर’ने सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona outbreak in the country issue in rajyasabha