esakal | ब्रिटन, सिंगापूरकडून ऑक्सिजन-व्हेंटिलेटर्सची पहिली खेप भारताकडे रवाना

बोलून बातमी शोधा

Britan helps india

ब्रिटन, सिंगापूरकडून ऑक्सिजन-व्हेंटिलेटर्सची पहिली खेप भारताकडे रवाना

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणांवर प्रचंड ताण आला असून रुग्णांना योग्य प्रकारे वैद्यकीय उपचार देण्यात अडचणी येत आहेत. देशात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ब्रिटन, सौदी अरेबिया, जर्मनी, युरोपीयन कमिशन, युरोपीयन युनियन आदींना भारताला ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स तसेच इतर महत्वाचे वैद्यकीय उपकरणं पाठवण्याची तयारी सुरु केली आहे.

ब्रिटन पाठवणार ६०० हून अधिक वैद्यकीय उपकरणं

ब्रिटनकडून भारतासाठी ६००हून अधिक वैद्यकीय उपकरणं पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स यांचा समावेश आहे. ब्रिटनच्या डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अॅण्ड सोशल केअर विभागाकडून राखीव जीवरक्षक उपकरण भारतासाठी पाठवण्यात येणार असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं. या उपकरांची पहिली खेप युकेमधून आज (रविवारी) भारताकडे रवाना झाली आहे. मंगळवारी सकाळी नवी दिल्लीत विमानाद्वारे ही उपकरण दाखल होतील. त्यानंतर या आठवड्यात पुढील खेपा पाठवल्या जाणार आहेत. यामध्ये ९ एअरलाईन कन्टेनर्स आहेत ज्यामध्ये ४९५ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स, १२० सौम्य व्हेंटिलेटर, २० मॅन्युअर व्हेंटिलेटर या आठवड्यात पाठवण्यात येणार आहे.

जर्मनी 'मिशन सपोर्ट' अतंर्गत करणार तातडीची मदत

जर्मनीच्या चान्सलर अन्जेला मार्केल यांनी भारताला 'मिशन सपोर्ट' अंतर्गत तातडीची मदत पुरवणार असल्याचं सांगितलं आहे. मार्केल यांनी म्हटलं की, भारतीयांप्रती मी सहानुभूती व्यक्त करते. कोरोना महामारीशी लढा हा सर्वांचा सामायिक लढा आहे. त्यामुळे जर्मनी या लढ्यात भारतासोबत आहे आणि त्यामुळे तातडीने 'मिशन सपोर्ट' सुरु करत आहे.

युरोपियन युनियन पाठवणार ऑक्सिजन आणि वैद्यकीय मदत

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वोनदेर लेयन म्हणाल्या, भारतात साथीच्या रोगाची स्थिती गंभीर बनली आहे. आम्ही भारताला मदत करण्यास आणि गरजेची उपकरणं तातडीने पाठवण्यासाठी तयार आहोत. भारताने यासाठी आमच्याकडे मदत मागितली आहे. या संकट काळात आम्ही पूर्णपणे भारतासोबत आहेत. तसेच युरोपियन युनियनने देखील भारतासाठी मदतीचा हात दाखवला आहे. या कठीण प्रसंगी आम्ही भारताला मदत करणार आहोत असे युरोपीयन युनियनचे अॅम्बेसिडर उगो अॅस्टिगो यांनी सांगितलं आहे. युरोपियन युनियन भारताला शक्य ती सर्व मदत गोळा करण्याचे काम करत आहे. आम्ही तातडीने ऑक्सिजन आणि वैद्यकीय मदत पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

अमेरिका ४ कोटी अॅस्ट्राझेनिका लसचे डोस पाठवण्याच्या प्रयत्नात

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलीयन यांनी म्हटलं की, ''भारतातील कोरोना उद्रेकाची अमेरिकेने दखल घेतली आहे. कोरोना काळात विषाणूविरोधात लढण्यासाठी महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठा केला जाईल'. अमेरिकेत शिल्लक असलेले ४ कोटी अॅस्ट्राझेनकाची लस भारताला मिळण्याची शक्यता आहे. फ्रान्सचे राजदूत इम्यनुएल लेनेनं यांनी ट्विट करुन म्हटलंय की, ''संकटामध्ये आम्ही भारतासोबत आहोत आणि त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे.'' तसेच ऑस्ट्रलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताने कोरोना काळात केलेल्या मदतीचा उल्लेख करतानाच मदतीचे आश्वासन दिलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही कोरोना लढ्यात भारतासोबत असल्याचं म्हटलं आहे. मानव जातीसमोर असलेल्या संकटात आम्ही सर्वजण एकत्र आहोत. या काळात आम्ही भारतासोबत खंभीरपणे उभे आहोत, असं ते म्हणाले आहेत.