Corona Updates: देशात 80 लाख कोरोनामुक्त; सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाखांच्या खाली

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 11 November 2020

गेल्या 3-4 आठवड्यांतील सक्रिय रुग्णांचा ट्रेंड पाहिला तर रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहेत.

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने कहर केला असताना भारतातील स्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. देशात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5 लाखांच्या खाली गेली आहे. तब्बल 106 दिवसांनंतर सक्रिय रुग्णसंख्या 5 लाखांच्या खाली आली आहे. 

सक्रिय रुग्णांची संख्या कमी होतेय-
7 ऑगस्टला देशात सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास 6 लाखांच्या आसपास होती तर 20 सप्टेंबरला हा आकडा वाढून 10 लाखांच्या वर गेला होता. त्यानंतर हळूहळू कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत गेली. मागील 24 तासांतील आकडेवारीनुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या 5 लाखांच्या खाली गेली आहे. गेल्या 3-4 आठवड्यांतील सक्रिय रुग्णांचा ट्रेंड पाहिला तर रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहेत. 

MP By Election: ज्योतिरादित्य शिंदेंच्या समर्थक इमरती देवींचा पराभव, नातेवाईकानेच केली मात

80 लाकांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त-
दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 80 लाख 13 हजार 784 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत देशात 50 हजार 326 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या देशात कोरोनाचे 4 लाख 94 हजार 657 रुग्ण उपचार घेत आहेत. 

बाधितांचा आकडा 86 लाखांच्या पुढे-
मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 44 हजार 281 रुग्णांचे निदान होऊन 512 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात 86 लाख 36 हजार 12 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून 1 लाख 27 हजार 571 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- Bihar Election : 'बिहार में फिरसे नितीश कुमार बा'; समर्थकांनी लावले पोस्टर्स

कोरोना चाचण्यांची संख्या वाढत असल्याने नवीन रुग्णांना ट्रेस करण्यात फायदा होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रसारावर लगामही लावला जात आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 11 लाख 53 हजार 294 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंतचा कोरोना चाचण्यांचा आकडा 12 कोटी 7 लाख 69 हजार 151 वर गेल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona recovered cases reaches above 80 lakh