Bihar Election : 'बिहार में फिरसे नितीश कुमार बा'; समर्थकांनी लावले पोस्टर्स

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

बिहारमधील पाटणामध्ये विजयाचा आनंद करण्यासाठी पोस्टर्स लावले आहेत.

पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल काल लागला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. शेवटपर्यंत अटीतटीचा सामना रंगला. पण सरतेशेवटी नितीश कुमार यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे. असं असलं तरीही जेडीयूच्या जागा घटल्या आहेत. त्या 43 वर आल्या आहेत तर भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तर तेजस्वी यादवांनी 'तेजस्वी' अशी कामगिरी करत राज्यातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून राजदला 75 जागांवर निवडून आणलं. काँग्रेसला 19 जागांवर समाधान मानावं लागलं. 

आणि आता एनडीएने या विजयाचा आनंदोत्सव साजरा करायला सुरु केलं आहे. बिहारमधील पाटणामध्ये विजयाचा आनंद करण्यासाठी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सवर 'बिहार में का बा?' असा  प्रश्न टाकून त्याखाली 'फिर से नितीश कुमार बा!' असं लिहलं आहे. तसेच एका पोस्टरवर No confusion, Great Combination असंही लिहलं आहे. तसेच डबल इंजिन सरकार ने फिर से रचा इतिहास असं लिहून डबल इंजिनही दाखवलं आहे. एका पोस्टरवर नितीश कुमार यांच्या फोटो लावून बिहार ने फिर से चुना 24 कॅरेट गोल्ड असं लिहलं आहे.

हेही वाचा - Bihar Election: मध्यरात्री निवडणुकीचे चित्र स्पष्ट; एनडीएला बहुमत, 125 जागांवर विजय

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी भाजपने बिहार में इ बा अशा आशयाचे गाणे प्रसिद्ध केले होते. त्याला उत्तर म्हणून राजदने बिहार में का बा? असं विचारणारे गाणे राजदने प्रसिद्ध केले होते. यावरुनच टोला हाणत आता नितीश समर्थकांनी याप्रकारचे पोस्टर्स लावले आहेत. 

हेही वाचा - Bihar Election 2020: राजकारणात 'तेजस्वी' स्थान अधोरेखित

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात झाली. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत बेरोजगारीच्या मुद्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. मतमोजणी  पूर्व सर्व अंदाजांनी राजदच्या तेजस्वी यांना स्पष्ट बहुमत दिले होते. मात्र, अंतिम क्षणापर्यंत चुरस होऊन सरतेशेवटी एनडीएची डबल इंजिन सरकारला बहुमत  प्राप्त झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar election result 2020 Posters put up in Patna following the victory of CM Nitish Kumar