Corona Updates: लोकसंख्येच्या प्रमाणात जगात भारतात सर्वात कमी रुग्ण

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 16 November 2020

जगभरात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना भारतातील परिस्थिती दिलासादायक आहे.

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना भारतातील परिस्थिती दिलासादायक आहे. जगभराचा विचार केला तर सध्या भारतात 10 लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी रुग्ण आहेत. भारतात सध्या 10 लाख लोकसंख्येमागे 6 हजार 387 कोरोना रुग्ण आहेत. यातही दिलासादायक बाब म्हणजे 15 राज्ये अशी आहेत जिथं देशाच्या सरासरीपेक्षा कमी रुग्ण आहेत. 

सर्वात कमी रुग्ण बिहारमध्ये आहेत. बिहारमध्ये 10 लाख लोकसंख्येमागे 1008 रुग्ण आहे. त्यानंतर उत्तरप्रदेश (2144), मध्य प्रदेश (2145), मिझोरम (2738), झारखंड (2745), राजस्थान (2760) रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

मागील 24 तासांत देशात कोरोनाचे (COVID19) 30 हजार 548 रुग्ण आढळले असून 435 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनाचे 88 लाख 45 हजार 127 लोकांना कोरोनाची बाधा होऊन 1 लाख 30 हजार 70 जणांचा मृत्यू झाला आहे. 

सक्रिय रुग्णांची कमी होत आहेत-
दिलासादायक बाब म्हणजे बाधितांपैकी तब्बल 82 लाख 49 हजार 579 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील 24 तासांत देशात 43 हजार 851 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याघडीला देशात सध्या कोरोनाचे 4 लाख 65 हजार 478 रुग्ण उपचार घेत आहेत. तर मागील 24 तासांत सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 738 ने कमी झाली आहे.

'दिल्लीत चाचण्या वाढवा'
देशात रविवारी 8 लाख 61 हजार 706 कोरोना चाचण्या पार पडल्या. तर आतापर्यंत देशात कोरोनाच्या 12 कोटी 56 लाख 98 हजार 525 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research)दिली आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील चाचण्यांची संख्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona recovered in India crossed 82 lakh