लाल किल्ल्याभोवती कोरोना सुरक्षा कवच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lal-Killa

‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पाचा अंगीकार करत यंदा साजरा होणारा स्वातंत्र्यदिन सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. कोरोनामुळे यंदा मुख्य कार्यक्रमस्थळी आरोग्याच्या दृष्टिकोनातून विशेष खबरदारी घेण्यात आली असून तशी तयारी देखील करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाताचा जेथे- जेथे स्पर्श होऊ शकतो, त्या साऱ्या जागा एक विशिष्ट प्रकारचा ‘कोरोना रोधक लेप’ लावून सुरक्षित करण्यात येत आहेत.

लाल किल्ल्याभोवती कोरोना सुरक्षा कवच

नवी दिल्ली - ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पाचा अंगीकार करत यंदा साजरा होणारा स्वातंत्र्यदिन सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. कोरोनामुळे यंदा मुख्य कार्यक्रमस्थळी आरोग्याच्या दृष्टिकोनातून विशेष खबरदारी घेण्यात आली असून तशी तयारी देखील करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाताचा जेथे- जेथे स्पर्श होऊ शकतो, त्या साऱ्या जागा एक विशिष्ट प्रकारचा ‘कोरोना रोधक लेप’ लावून सुरक्षित करण्यात येत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नेहमी १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिक, मंत्री आदी किमान १० हजार लोकांना येथे आमंत्रित केले जाते. मात्र यंदा विद्यार्थी व ज्येष्ठ अभ्यागतांना वगळण्यात आले आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, सॅनिटायजर व आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करणे आदी अटींचे पालन करणे अनिवार्य असेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निवडक लोकांनाच प्रवेश
कोरोना योद्धे, दिल्ली पोलिसांचे २०० जवान, निमलष्करी दलाचे निवडक सैनिक व खास पाहुणे अशा दीड हजार लोकांनाच या परिसरात प्रवेश असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा सलग सातव्या वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. कोरोनामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन जास्त गर्दी न जमविता साजरा करावा अशा सूचना गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना केल्या आहेत. यंदाच्या कार्यक्रमासाठी सुरक्षेबरोबर आरोग्य सुरक्षेच्या उपाययोजनाही करण्यात आल्या असून लाल किल्ल्याच्या परिसरात त्याची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान ज्या- ज्या भागांतून राष्ट्रध्वजाकडे व त्याच्या जवळच असलेल्या मंचाकडे जातील त्या सर्व भागांना खास कोटिंग करण्यात येत आहे. 

तपशील गोपनीयच
या विशिष्ट लेपाचे तपशील सुरक्षा कारणामुळे जाहीर करण्यात आले नसले तरी त्याच्या निर्मितीत ‘आयुष’ मंत्रालयाचा महत्वपूर्ण सहभाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा लेप एखाद्या जागेवर लावला की पुढचे पाच ते सात दिवस कोरोना विषाणू त्या परिसराकडे फिरकू शकत नाही असा तज्ज्ञांचा दावा आहे. 

कार्यक्रमाचे वेबकास्टिंग होणार
मोदी यांचा ज्या वस्तूंना स्पर्श होऊ शकतो ते भाग म्हणजे जिन्यांचे कठडे, पायऱ्या, ध्वजाची दोरी इत्यादींना हा लेप लावण्यात येत आहे. यंदा या समारंभाचे वेबकास्टिंग होणार आहे. त्यादृष्टीने परिसरात एलईडी स्क्रीन लावण्यात येत असून पोलिस बॅंडही यंदाच्या या समारंभात दिसणार नाही. पंतप्रधानांना मानवंदना देण्यासाठी निवडण्यात आलेल्या ३०० जवानांना काटेकोर कोरोना चाचणीनंतर १५ दिवस आधीच दिल्ली पोलिसांच्या खास कक्षात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

Edited By - Prashant Patil

टॅग्स :IndiaNarendra Modi