Corona Update - देशातील रुग्णसंख्या 81 लाखांवर; तीन महिन्यानंतर दिलासादायक आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

देशात आतापर्यंत एकूण 81 लाख जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदाच दिलासादायक अशी आकडेवारी समोर आली आहे. 

नवी दिल्ली - भारतातील नव्या कोरोना रुग्णांचा वेग मंदावला आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असून देशात आतापर्यंत एकूण 81 लाख जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदाच दिलासादायक अशी आकडेवारी समोर आली आहे. देशात 3 ऑगस्टनंतर ऑक्टोबर अखेरीस सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. भारतातील कोरोना रुग्णांची सख्या 81 लाख 37 हजार 119 इतकी झाली आहे. यापैकी 74 लाख 32 हजार 829 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

दरम्यान, तीन महिन्यांनी भारतात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या घटली आहे. सप्टेंबरमध्ये कोरोनाने भारतात हाहाकार माजवला होता. गेल्या 24 तासात देशात 48 हजार 268 नवे रुग्ण आढळले असून 551 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 21 हजार 641 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर देशात सध्या 5 लाख 82 हजार 649 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दिवसभरात 59 हजार 454 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

देशातील रिकव्हरी रेट वाढत असून तो 91.34 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यू दर 1.49 टक्के इतका आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाणही कमी झाले असून ते 4.51 टक्क्यांवर आले आहे. भारतात तीन ऑगस्टनंतर कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढले. तेव्हापासून सक्रीय रुग्णांचा आकडाही नेहमीच जास्त होता. तो पहिल्यांदाच शुक्रवारी कमी नोंदवला आहे. 3 ऑगस्टला भारतात 5 लाख 85 हजार 581 इतके सक्रीय रुग्ण होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona update india covid 19 cross 81 lakh cases 31 oct