Corona Update : गेल्या 24 तासांत भारतात 15,968 नवे रुग्ण; आणखी 4 लसींना मंजूरीची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

कोरोनाविरोधातील लढ्याचे अंतिम पर्व सुरु आहे, असं म्हणायला हरकत नाही.

नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढ्याचे अंतिम पर्व सुरु आहे, असं म्हणायला हरकत नाही. एकीकडे कोरोनाच्या आकड्यांना उतरती कळा लागली आहे. तर दुसरीकडे कालच सीरमच्या लसीचे देशभरात ठिकठिकाणी वितरण झाले. काल गेल्या 7 महिन्यांतील सर्वांत कमी रुग्णवाढ आढळली आहे. तर आरोग्य सचिवांनी सांगितलंय की आणखी चार लसींना देशात मंजूरी मिळण्याची शक्यता येत्या काळात आहे. 

कोरोनाच्या आणखी चार लसी सध्या मंजूरीच्या वाटेवर असून या लसी निर्मिती करणाऱ्या कंपन्या ड्रग्ज कंट्रोलरकडे जाऊ शकतात, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने काल मंगळवारी दिली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी म्हटलं की, झायडस कॅडिला, स्फुटनिक-व्ही, बायोलॉजिकल ई आणि जेनोव्हा (Zydus Cadila, Sputnik V, Biological E and Gennova) या चार लशी सध्या क्लिनिकल चाचण्यांच्या प्रक्रियेत आहेत. 

गेल्या 24 तासांत भारतात 15,968 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही 1,04,95,147 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत एकूण 17,817 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,01,29,111 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशात 202 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील एकूण आजवरच्या मृतांची संख्या ही 1,51,529 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात एकूण 2,14,507 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गेल्या 24 तासांत कोरोनाच्या एकूण 8,36,227 चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 18,34,89,114 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती India Council of Medical Research (ICMR) ने दिली आहे. 

काल सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड या लशीची पहिली खेप देशभरात ठिकठिकाणी पाठवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र राज्याने 9.36 लाख खुरांकाची ऑर्डर दिली होती. हे खुराक महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य खात्याकडून स्विकारण्यात आले आहेत.  

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2936 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 19,74,488 वर जाऊन पोहोचली आहे. काल 3282 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,71,270 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 50 रुग्ण दगावले आहेत. या रुग्णांसह राज्यातील एकूण दगावलेल्या रुग्णांची संख्या ही 50,151 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 51,892 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Marathi 13 January 2021