Corona Update : देशात रुग्णसंख्या मंदावली, नव्या स्ट्रेनचा शिरकाव; ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 January 2021

नव्या स्ट्रेनच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत देशात लॉकडाऊन लागू केला आहे.

नवी दिल्ली : गेल्या एका वर्षापासून जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा धुमाकूळ अद्याप संपुष्टात आला नाहीये. अनेक युरोपिय देशांमध्ये आपत्कालीन पातळीवर सध्या लशीकरण होत आहे. भारतात देखील दोन लशींना मान्यता दिली गेली असून लवकरच लशीकरणास सुरवात होणार आहे. अशातच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शोध लागल्यामुळे चिंता पुन्हा वाढल्या आहेत. हा स्ट्रेन जगभरात वेगाने पसरत असून भारतात देखील याचे रुग्ण आढळून आले आहेत. अद्याप भारताता नव्या स्ट्रेनचे 58 रुग्ण आढळले आहेत. या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवरच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत देशात लॉकडाऊन लागू केला आहे.

गेल्या 24 तासांत भारतात 16,357 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. या नव्या कोरोनाबाधितांसह भारतात आजवर सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 1,03,56,845 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 29,091 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 99,75,958 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 201 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशांतील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या ही 1,49,850 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशातील एकूण ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 2,31,036 आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

गेल्या 24 तासांत एकूण 8,96,236 कोरोनाच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील एकूण आजवरच्या चाचण्यांची संख्या ही 17,65,31,997 वर पोहोचली आहे. याबाबची माहिती Indian Council of Medical Research ने दिली आहे. 

काल महाराष्ट्रात 2,765 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण आजवरच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 19,47,011 वर जाऊन पोहोचली आहे. काल 10,362 रुग्णांना राज्यात डिस्चार्ज दिला गेला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 18,47,361 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी गेले आहेत. काल 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 49,695 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात एकूण 48,801 रुग्ण ऍक्टीव्ह असून उपचार घेत आहेत.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Marathi Report 5 january 2021