देशात कोरोनाची आकडेवारी देतेय धोक्याचा इशारा; महाराष्ट्र, केरळमध्ये चिंतेची बाब

टीम ई सकाळ
Monday, 22 February 2021

केंद्राने या पाच राज्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात यावं, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर हे गरजेचं आहे असंही केंद्राने म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जवळपास 4 हजार 421 नवे रुग्ण आढळले आहेत. ही वाढ जवळपास तीन टक्के इतकी आहे. गेल्या 17 दिवसात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या दीड लाखांच्यावर पोहोचली आहे. सोमवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर अखेरनंतर सक्रीय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पहिल्यांदाच बघायला मिळाली आहे. सलग पाचव्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे. 

सक्रीय रुग्णांची संख्या 24 तासात किती नवीन रुग्ण आढळले आणि किती कोरोनामुक्त झाले यावरून काढली जाते. या पाच दिवसात 13 हजार 506 सक्रीय रुग्ण वाढले आहेत. गेल्या आढवड्यात सक्रीय रुग्ण वाढण्याचा दर 1.5 टक्के इतका होता. तो आता वाढला असून दुप्पट झाला आहे. प्रत्येक दिवशी सापडणाऱ्या नव्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. गेल्या आठवड्यात 16 फेब्रुवारीला सक्रीय रुग्ण 9 हजार 121 इतकी होती. मात्र 22 फेब्रुवारीला हीच संख्या 14 हजार 199 झाली आहे. 

हे वाचा - आधीच्या सरकारकडून आसामला सावत्रपणाची वागणूक; मोदींचा काँग्रेसवर निशाणा

गेल्या आठवड्यातील वृद्धी दराबाबत सांगायचं झालं तर सरासरी 13.8 इतका आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. केंद्राने या पाच राज्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात यावं, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर हे गरजेचं आहे असंही केंद्राने म्हटलं आहे. 

हे वाचा - गुजरात राज्यसभेच्या दोन्ही जागा भाजपकडे; एक अहमद पटेलांच्या निधानामुळे होती रिक्त

सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे सक्रीय रुग्णांमध्ये केरळ आणि महाराष्ट्रातील रुग्णांचे प्रमाण जवळपास 74 टक्के इतकं आहे. छत्तीसगढ, मध्य प्रदेश, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्येही दर दिवशी नवीन रुग्ण आढळून येत आहेत. सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात एका आठवड्यात नवीन रुग्णांची सरासरी ही 5 हजार 230 इतकी आहे. 2 डिसेंबरला राज्यात 5 हजार 576 रुग्ण सापडले होते त्यानंतर 22 फेब्रुवारीला महाराष्ट्रात 6 हजार 971 रुग्ण आढळले. याआधी सर्वाधिक रुग्ण 24 ऑक्टोबरला 7 हजार 347 इतके सापडले होते. याशिवाय केरळमध्ये गेल्या आठवड्यात नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण 4 हजार 361 इतकं आहे. केरळमध्ये 22 फेब्रुवारीला 4 हजार 70 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona update maharashtra kerala india new cases