Corona Update : भारतात आठवड्यात रुग्णसंख्या पाचपट; दिवसभरात 33,750 नवे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

देशात २६ डिसेंबरला ६ हजार ५३१ जणांना कोरोनाची लागण झाली होती.

भारतात आठवड्यात रुग्णसंख्या पाचपट; दिवसभरात 33,750 नवे रुग्ण

देशात कोरोना (Corona) संसर्गात वेगाने वाढ होत आहे. गेल्या दोन आठवड्यांची आकडेवारी पाहिली तर डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या सरासरी दिवसाला साडे सहा हजार इतकी होती. तर तीच संख्या रविवारी ३३ हजार ७५० इतकी होती. जवळपास १०७ दिवसानंतर ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. २ जानेवारीपर्यंतच्या आठवड्यात दिवसाला सरासरी १८ हजार कोरोनाचे रुग्ण आढळले. १२ ऑक्टोबरनंतर आठवड्याच्या सात दिवसांच्या सरासरीत ही संख्या पहिल्यांदाच जास्त आहे. २६ डिसेंबरला ६ हजार ५३१ जणांना देशात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज हीच संख्या पाचपट झाली असून ३३ हजारांच्या वर कोरोना रुग्ण आढळले आहेत.

भारतात रविवारी कोरोनाचे ३३ हजार ७५० रुग्ण आढळले. तर दिवसभरात १० हजार ८४६ जण कोरोनामुक्त झाले. दिलासा देणारी बाब म्हणजे मृत्यूची संख्या शनिवारच्या तुलनेत कमी आहे. गेल्या २४ तासात १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १ लाख ४५ हजार ५८२ सक्रीय रुग्ण आहेत. तर ३ कोटी ४२ लाख ९५ हजार ४०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे भारतात ४ लाख ८१ हजार ८९३ जणांनी प्राण गमवावे लागले आहेत.

अडीच महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत इतकी मोठी वाढ झाली आहे. ज्या वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय ते चिंताजनक आहे. २५ डिसेंबरच्या आठवड्यात सात दिवस सरासरी ६ हजार ६४१ कोरोना रुग्ण आढळत होते. तर यानंतर एका आठवड्यात संसर्गात मोठी वाढ झाली. रविवारी ३० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. म्हणजेत जवळपास गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात पाचपट अधिक रुग्ण एका दिवसात सापडले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर येत्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: वैद्यकीय सुविधांसाठीचा निधी खर्च करा, अन्यथा उशिर होईल - केंद्र

जागतिक आरोग्य संघटनेनंसुद्धा म्हटलं होतं की, ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा जास्त वेगाने पसरत आहे. लस घेतलेल्या आणि कोरोनावर मात केलेल्यांनासुद्धा पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते. भारतात २७ डिसेंबर ते २ जानेवारी या आठवड्यात १ लाख ३० हजार रुग्ण आढळले. गेल्या १२ आठवड्यात ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusIndia
loading image
go to top