
कोरोना व्हायरसशी सुरु असलेल्या लढाईला आता निर्णायक वळण आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी सुरु असलेल्या लढाईला आता निर्णायक वळण आहे. गेल्या 16 जानेवारीपासून देशात लसीकरणास सुरवात झाली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या दिवसी म्हणजे कालच्या दिवशी देशात 17 हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले. रविवारी सहा राज्यांमध्ये 500 हून अधिक केंद्रावर लसीकरणाची ही मोहिम पार पडली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव डॉ. मनोहर अगनानी यांनी म्हटलं की, शनिवारी देशामध्ये कोरोना व्हायरसचे लसीकरण सुरु झाल्यानंतर रविवारी आंध्र प्रदेश सहित सहा राज्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली गेली. एका आठवड्यात कमीतकमी दोन तर जास्तीतजास्त सहा दिवसांपर्यंत लस दिली जात आहे.
त्यांनी म्हटलं की आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मणिपूर आणि तमिळनाडूच्या 553 केंद्रांवर 17 जानेवारीला लसीकरण केलं गेलं आहे. या दरम्यान 17072 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली गेली. केरळ आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी एका केंद्रावर लस दिली गेली. पहिल्या दिवशी 3352 केंद्रांवर 1,91,181 लोकांना लस दिली गेली होती. सचिवांनी सांगितलं की देशातील काही केंद्रांवर रात्री उशीरापर्यंत लसीकरणाची मोहिम सुरु होती. यामुळे लसीकरणाचे एकूण आकडे केंद्रापर्यंत पोहोचायला वेळ लागला. यानंतर पहिल्या दिवशी लस घेणाऱ्यांची संख्या 1,91,181 वरुन 207,229 पोहोचली. तर दुसऱ्या दिवशी 17072 लोकांनी लस घेतली आहे. याप्रकारे आतापर्यंत देशात एकूण 2.24 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली गेली आहे.
जगात सगळ्यात जास्त लसीकरण भारतात
डॉ. अगनानी यांनी सांगितलं की जर जगातील छोट्या-मोठ्या देशांशी तुलना केली जगात सर्वांत जास्त लसीकरण हे भारतातच पार पडलं आहे. गेल्या दोन दिवसांत देशात 2,24,301 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली गेली आहे. हा आकडा अमेरिका, युरोप आणि फ्रान्ससहित इतर अनेक देशांच्य तुलनेत मोठा आहे जिथे कोरोना लसीकरणास भारताच्या आधीपासूनच सुरवात झाली आहे.