कोरोना लसीकरणात होणार खासगी क्षेत्राची एन्ट्री; केंद्र सरकारचा प्लॅन

टीम ई सकाळ
Tuesday, 23 February 2021

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आरोग्य मंत्रालयाला कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यास सांगितलं आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात होती. मात्र आता 50 वर्षांवरील आजारी लोकांना पुढच्या टप्प्यात लस दिली जाईल.

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग देशात वेगानं वाढत आहे. पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असून महाराष्ट्र , केरळ, छत्तीसगढ, पंजाब आणि मध्य प्रदेशात ही आकडेवारी जास्त आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आरोग्य मंत्रालयाला कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यास सांगितलं आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात होती. मात्र आता 50 वर्षांवरील आजारी लोकांना पुढच्या टप्प्यात लस दिली जाईल. देशात जवळपास 27 कोटी लोकांना लस देण्यासाठी खासगी क्षेत्राची मदत घेण्याची तयारी केली जात आहे. यामुळे लसीकरण मोहिम कमी वेळेत पूर्ण होऊ शकेल.

निति आयोगाचे सदस्य डॉक्टर वीके पॉल यांचे म्हणणे आहे की, कोरोना लसीकरणामध्ये खासगी क्षेत्राची भूमिका काय असेल याची सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल. केंद्र सरकारने कोरोनाबाबत स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर वीके पॉल जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी म्हटलं की, देशात सध्या लसीकरणामध्ये 20 टक्के खासगी कंपन्याच आहेत. लसीकरण मोहिमेत खासगी क्षेत्र हळू हळू वाढत जाईल. पुढच्या टप्प्यात जवळपास 40 ते 50 टक्के लसीकरण हे खासगी क्षेत्राच्या मदतीने केलं जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

हे वाचा - Corona Update: कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट; गेल्या 24 तासांत 78 जणांचा मृत्यू

गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानसह केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये 75 टक्क्यांहून जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. केंद्र सरकारने राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यास सांगितलं आहे. 

देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेशात प्रत्येक दिवशी नवीन रुग्ण सापडत आहेत. सक्रीय रुग्णांची संख्याही वाढली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासोबतच गर्दीच्या ठिकाणी कार्यक्रमांना बंदी घातली आहे. देशात सोमवारच्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccination private sector may enter india govt planning