स्थिती गंभीर! कोरोनाबाधितांचा आकडा 50 लाखांच्या पार; गेल्या 11 दिवसात 10 लाख रुग्णांची भर

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 16 September 2020

कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती गंभीर बनताना दिसत आहे

नवी दिल्ली- कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती गंभीर बनताना दिसत आहे. मंगळवारी देशातील एकूण (Corona Cases in India) कोरोनाबाधितांचा आकडा 50 लाखांच्या पुढे गेलाय. देशात कोरोना महामारीचे संक्रमण झपाट्याने होत आहेत. गेल्या केवळ 11 दिवसात 10 लाख कोरोनबाोधितांची नोंद करण्यात आली आहे, तर दोन महिन्यात 40 लाख कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येनेही 10 लाखांचा जवळ मजल मारली आहे. आतापर्यंत 80 हजारांपेक्षा अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतलाय. 

सीरमच्या क्लिनिकल ट्रायलला DCGI कडून परवानगी; पण...

गेल्या 24 तासांत देशात 90, 123 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 1,290 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा हा सर्वाधिक आकडा आहे, आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिलीये. देशात आतापर्यंत 50,20,360 कोरोनाबाधित आढळले आहेत. सध्या देशात 9,95,933 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशाचा रिकव्हरी रेटही वाढताना दिसत आहे. रिकव्हरी रेट 78.28 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. 39,42,361 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 

महाराष्ट्र कोरोना महामारीने सर्वाधिक प्रभावित राज्य ठरले आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 10.7 लाखांच्यावर गेला असून दरदिवशी 17 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडत आहेत. महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.  जवळपास अर्धे (48.8 टक्के) कोरोना रुग्ण देशातील तीन राज्यात सापडले आहेत. यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, तामीळनाडू, छत्तीसगड, ओडिसा, केरळ आणि तेलंगना या राज्यांमध्ये मिळून 25 टक्के कोरोनाबाधित आहेत. 

नेपाळ हादरले; शास्त्रज्ज्ञ म्हणताहेत ही मोठ्या भूकंपाची चाहूल

देशातील 37 टक्क्यांपेक्षा अधिक कोरोना मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 29,894 जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 33.44 टक्के मृत्यू (369) झाले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामीळनाडूमध्ये एकूण संख्येच्या 60.35 टक्के रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय या राज्यात एकूण संख्येच्या 59.42 टक्के रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus update india crosses 50 lakh mark