Corona Update - देशात सलग दुसऱ्या दिवशी 76 हजारांहून अधिक नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

भारतात गेल्या आठवड्याभरापासून कोरोना व्हायरसचा कहर झाला आहे. गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दरदिवशी 76 हजारांच्या वर गेली आहे. 

नवी दिल्ली - भारतात गेल्या आठवड्याभरापासून कोरोना व्हायरसचा कहर झाला आहे. गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दरदिवशी 76 हजारांच्या वर गेली आहे. बुधवारी विक्रमी 76 हजार 14 रुग्ण आढळले होते. त्याहून अधिक रूग्ण गुरुवारी सापडले आहेत. गुरुवारी एका दिवसात 76 हजार 489 नवे रुग्ण सापडले असून आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. याशिवाय एका दिवसात 1 हजार 81 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

कोरोना रुग्णांची ऑगस्ट महिन्यात झपाट्याने वाढ झाली आहे. आतापर्यंत ऑगस्टमध्ये 16 लाख 86 हजार 162 कोरोना रुग्णांची भर पडली. ही संख्या जवळपास 31 जुलैपर्यंत सापडलेल्या एकूण रुग्णसंख्येइतकीच आहे. 31 जुलैपर्यंत भारतात कोरोना रुग्णांची संख्या 16 लाख 94 हजार 918 इतकी होती. ऑगस्टमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले असून गुरुवारपर्यंत या महिन्यातील मृत्यूची संख्या 25 हजारांच्या वर गेली आहे. जुलै महिन्यात 19 हजार 122 मृत्यू झाले होते. 

देशात सध्या 7.4 लाख कोरोनाचे रुग्ण आहेत. तर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 25.8 लाखांवर पोहोचली आहे. गुरुवारी आढळलेली नवी रुग्णसंख्या ही कोणत्याही देशात एका दिवसातील तिसऱ्या क्रमांकाची आकडेवारी आहे. याआधी अमेरिकेत 25 जुलैला 78 हजार 427 आणि 25 जुलैला 76 हजार 730 इतके नवे रुग्ण आढळले होते. 

हे वाचा - कोरोना दैवी कोप, अर्थव्यवस्थेत येऊ शकते मंदी - निर्मला सीतारामन

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 33 लाख 80 हजारांहून अधिक झाली असून मृतांची संख्या 61 हजार 621 आहे. देशात महाराष्ट्रात गुरुवारी सर्वाधिक नवे रुग्ण आढळले. राज्यात एका दिवसात 14 हजार 718 रुग्ण आढळले. त्याआधी बुधवारी सर्वाधिक 14 हजार 888 इतके नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. आंध्रप्रदेशातही गुरुवारी 10 हजार 621 नवीन रुग्ण सापडले तर कर्नाटकात 9 हजार 386 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus updates india cross 76 k new cases back to back two days