esakal | ''खरंच काळजी असेल तर''; पुनावालांची बायडेन यांना हात जोडून विनंती
sakal

बोलून बातमी शोधा

Aadar Poonawala Joe Biden

''खरंच काळजी असेल तर''; पुनावालांची बायडेन यांना हात जोडून विनंती

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून देशात दोन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. असे असले तरी देशात लशींचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकार राज्यांना लशींचा मुबलक पुरवठा करत नाहीये, अशी चर्चा सुरु आहे. दुसरीकडे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी लसीसाठी कच्चा मालाची कमतरता जाणवत असल्याचं म्हटलं होतं. अमेरिका आणि युरोपने लशींसाठी लागणारा कच्चा मालाचा पुरवठा थांबवला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लशींची निर्मिती करण्यात अडथळा येत असल्याचं ते म्हणाले होते. आता अदर पुनावाला यांनी यासंबंधी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडे विनंती केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

आदरणीय अमेरिकेचे अध्यक्ष, आपण जर खरंच कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी एकत्र आलो आहोत, तर अमेरिकेबाहेरील सर्व लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून मी नम्रपणे विनंती करतो की, अमेरिकेबाहेर होणाऱ्या कच्चा मालाच्या निर्यातीवरील बंदी तुम्ही हटवावी. जेणेकरुन लशींचे उत्पादन थांबणार नाही. तुमच्या प्रशासनाकडे यासंबंधी सविस्तर माहिती आहे, अशी हात जोडून विनंती अदर पुनावाला यांनी ज्यो बायडेन यांच्याकडे केली आहे.

कच्चा मालाचा मुद्दा अदर पुनावाला यांनी याआधीही अनेकवेळा उपस्थित केला आहे. अमेरिका आणि यूरोपकडून कच्चा मालाचा पुरवठा म्हणावा तसा होत नाहीये. मला शक्य असतं तर मीच स्वत: अमेरिकेत जाऊन आंदोलन केलं असतं. त्यांच्या या धोरणाचा निषेध केला असता. अमेरिकेने अत्यंत महत्त्वाच्या कच्चा मालाचा पुरवठा थांबवला आहे. याचा परिणाम केवळ भारतावरच नाही, जगभरातील अनेक देशांवर पडत आहे. लशीच्या निर्मितीसाठी अमेरिकेतून मिळणारा कच्चा माल गरजेचा असल्याचं अदर पुनावाला म्हणाले होते.

हेही वाचा: Breaking: सिरमची कोरोनावरील दुसरी लस लवकरच बाजारात; अदर पुनावाला यांची माहिती!

दरम्यान, भारतात सध्या दोन लशींच्या वापराला परवानगी आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशींचा समावेश आहे. सीरम Astrazeneca आणि Oxfordसोबत संयुक्तपणे लसीची निर्मिती करत आहे. माहितीनुसार, सध्या महिन्याला 6 कोटींच्या पुढे लशींचे उत्पादन सीरमच्या प्लांटमधून होत आहे. कोरोनाचा सध्याचा संसर्ग लक्ष्यात घेता, तो आणखी वाढवण्याकडे सीरम इन्स्टिट्यूटचा भर आहे.